आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदी? ऑटो क्षेत्राला हवे पॅकेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाच्या ऑटोमोबाइल क्षेत्राच्या वाढत्या घसरणीमुळे उत्पादकांच्या चिंता वाढल्या आहेत. अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी ऑटोमोबाइल क्षेत्रातील घसरण चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. या क्षेत्राला प्रोत्साहन पॅकेज देण्यासाठी आवश्यक आणि संभाव्य उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासोबत ऑटोमोबाइल क्षेत्राच्या प्रतिनिधींची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

पटेल यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत वाहनांची विक्री मोठय़ा प्रमाणात घटली आहे. अशा परिस्थितीत वाहन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या संदर्भात आपण सरकारच्या सतत संपर्कात आहोत. सियाम आणि इतर भागीदारांसोबत समग्र ऑटो क्षेत्राच्या प्रतिनिधींसोबत पंतप्रधानांची एक बैठक आयोजित करण्याचा प्रयत्नात आपण आहोत. यात उद्योगांच्या सद्य:परिस्थितीची कल्पना सरकारला देण्यात येईल. यातून काही ना काही मार्ग निघण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. उद्योगांतील या मंदीमुळे रोजगार क्षेत्रावरही मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पटेल पुढे म्हणाले की, अर्थव्यवस्थेतील नरमाईमुळे वाढीव व्याजदरांमुळे देश तसेच विशेषकरून मध्यमवर्गावर मोठा परिणाम होतो. व्याजदरांवरच ईएमआय ठरत असल्याने मोठय़ा वस्तू आणि कारच्या खरेदीसारख्या बाबींवर त्यांचा परिणाम जाणवतो. यामुळे आर्थिक सुस्तीच्या काळात वाढलेल्या व्याजदरांचा फेरविचार होणे अत्यंत गरजेचे आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने याबाबतीत अर्थमंत्रालयासमोर आपले म्हणणे मांडलेले आहे.