आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reserve Bank Consantrate On Controlling Of Rupee

रिझर्व्ह बँकेचा झोत आता महागाईवरून रुपया नियंत्रणावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बाजारातील मागणी आणि पुरवठा यांच्यात संतुलन राखणे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असते. यापैकी एक जरी घटक कमी-जास्त झाला तरी अर्थव्यवस्थेत त्याचे पडसाद उमटतात. महागाई हा भारतीय अर्थव्यवस्थेतील कळीचा मुद्दा. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत असते. बाजारात पैसा मुबलक प्रमाणात असल्यास महागाई वाढते, असे गृहितक आहे. हे गृहीत धरूनच रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत प्रयत्न केले.

रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवून बाजारातील पैसा कमी करण्यास सुरुवात केली. मार्च 2011 नंतर रिझर्व्ह बँकेने सलग तेरा वेळा व्याजदरात वाढ केली होती. तेव्हा दोन आकडी घरात असलेली महागाई आता 4.86 टक्क्यांवर आली आहे. हे साध्य करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँकांकडे असणारा पैसा सीआरआर वाढवून काढून घेतला. व्यापारी बँकांकडे असलेल्या एकूण ठेवींपैकी तीन टक्के निधी रिझर्व्ह बँकेकडे रोख राखीव निधी (कॅश रिझर्व्ह रेशो-सीआरआर) म्हणून ठेवावा लागतो. यामुळे बाजारातील पैशांचा पुरवठा कमी होतो व मागणी वाढते. मात्र, गेल्या महिनाभरापासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाचा झोत महागाईवरून रुपयावर आला आहे.


मात्र, रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रण करण्यासाठी सीआरआरचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढवले तर बाजारात पैशाची चणचण निर्माण होते. बँकांना पैसा कमी पडू लागतो. परिणामी बँका ठेवींवरील व्याज वाढवून ग्राहकांकडील पैसा बँकांकडे वळवतात. मात्र, असे करताना कर्जावरील व्याज वाढते. परिणामी उद्योगांना महागडे कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे बाजारात पैशाची चणचण निर्माण होते. अशा वेळी रिझर्व्ह बँक सीआरआरमध्ये कपात करून बाजारात अधिक पैसा आणते.


आरबीआयच्या हातातील नियंत्रणाचे हुकमी एक्के
० रेपो रेट : रिझर्व्ह बँकेकडून व्यापारी बँकांनी घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्जावरील व्याजदर म्हणजे रेपो रेट. व्यापारी बँकांना पैशाची निकड भासल्यास त्या रिझर्व्ह बँकेकडून अल्प काळासाठी कर्ज घेतात. रिझर्व्ह बँक पैशांचा ओघ या मार्गाने आटोक्यात ठेवते. समजा सढळ हाताने अर्थसाह्य करायचे नसेल तर रेपो दर वाढवण्यात येतो. सध्या रेपो रेट 7.25 टक्के आहे. बँकांना पैसा उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रथम सीआरआरचे प्रमाण कमी करते. त्यावर भागले नाही तरच रेपो रेटमध्ये कपात होते. रेपो रेट कमी झाल्यास गृह, वाहन कर्ज स्वस्त होते.
० बँक रेट : रिझर्व्ह बँकेकडून अनेक व्यापारी बँका दीर्घ मुदतीचे कर्ज घेतात, त्यावरील व्याजदर म्हणजे बँक रेट होय. रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने यात दोन टक्के वाढ केली. आता हा दर 10.25 टक्के आहे. यामुळे अर्थव्यवस्थेतील रोख रक्कम कमी होते.
० रिव्हर्स रेपो रेट : व्यापारी बँकांकडून रिझर्व्ह बँकेत ठेवण्यात आलेल्या निधीवरील व्याज म्हणजे रिव्हर्स रेपो रेट. सध्या हा दर 4 टक्के आहे. बाजारात अधिक पैसा आणताना हा दर कमी केला जातो. सीआरआर वाढवल्यास व्यापारी बँकांना रोख भांडवल कमी मिळत.
० कमर्शियल पेपर : मोठ्या कंपन्या बँकांकडून प्रॉमिसरी नोटच्या (हमीपत्र) मार्गाने कर्ज घेतात. कमर्शियल पेपरच्या (सीपी) माध्यमातून तातडीने पैसा उभा करता येतो.
० एसएलआर : व्यापारी बँकांना आपल्याकडील ठेवींचा काही भाग सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणे आवश्यक आहे. यालाच स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो (एसएलआर) म्हणतात. बँकांकडील पैसा काढून घेणे- वाढवणे यासाठी याचा वापर होतो.