आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reserve Bank Of India Hikes The Lending Rate By 0.25 Percent In India

आर्थिक मंदीची चाहूल; भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून वाढत असलेला चलनवाढीचा दर नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) आज (मंगळवारी) रेपो दरात पाव टक्क्याने वाढ केली. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी आज सकाळी चालू आर्थिक वर्षातील अंतिम तिमाहीचे पहिले पतधोरण जाहीर केले. मात्र, रोख राखीव निधीच्या प्रमाणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याचा शेअर बाजारावर तत्काळ परिणाम दिसून आला आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक 125 अंकांनी घसरला आहे.

रघुराम राजन म्हणाले, दोन महिन्यांनंतर उर्जित पटेल समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण आढावा घेतला आहे. आजची स्थिती आर्थिक मंदीची चाहूल दर्शवत असल्याचे संकेतही मानले जात आहे. आर्थिक वर्ष 2014 मध्ये कोणत्याही दरात वाढ होणार नसल्याचेही ग्वाहीही राजन यांनी दिली आहे. एक एप्रिल 2014 रोजी पतधोरणाचा आढवा घेतला जाणार आहे.

रेपो दरात पाव टक्क्याने वाढ झाल्यामुळे तो 8 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचवेळी रोख राखीव निधीचे प्रमाण 4 टक्के इतके कायम ठेवण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यताही बॅंकेने यावेळी वर्तविली. पुढील आर्थिक वर्षात तो 5.5 टकक्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वीही आरबीआयने गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या तोंडावर रेपो दरात वाढ केली होती.

रेपो दरात वाढ केल्याने आरबीआयने वाढत्या महागाईच्या आगीत आणखी तेल ओतले असल्याच्या प्रतिक्रिया जनमाणसातून उमटू लागल्या आहेत. कर्ज आणखी महागण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.