आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिव्हर्स इनोव्हेशन :कमी किमतीतील नॅनो कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या युरोप-अमेरिकेत ‘रिव्हर्स इनोव्हेशन’ या संकल्पनेची चर्चा जोरात सुरू आहे. ‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू’ या नियतकालिकात जनरल इलेक्ट्रिकल या बलाढ्य कंपनीचे अध्यक्ष जेम इमेल्ट आणि अर्थतज्ञ विजय गोविंदराजन यांनी संयुक्तपणे एक लेख लिहिला. ‘हाऊ जी.ई. इज डिस्ट्रप्टिंग इटसेल्फ’ असे त्याचे शीर्षक होते. आजवर नव्या औद्योगिक कल्पनांचा जन्म युरोप-अमेरिकेत होत होता. त्या कल्पनांवर आधारित उत्पादनही तिथेच तयार व्हायचे. मग ते बहुराष्‍ट्रीय कंपन्यांमार्फत जगभर विकले जाई. त्यामुळे उत्पादनक्षम नव्या संकल्पना अमेरिकेतच जन्माला येतात अशी सर्वांचीच समजूत झाली होती. भारतासह इतर देश या उत्पादनांची नक्कल करण्यातच समाधान मानत. आता गेल्या काही वर्षांत जगभर पोहोचवता येईल अशी संकल्पना अमेरिकेत जन्मात आलेली नाही. याउलट टाटांच्या ‘नॅनो’ मोटारीने सर्व जगाला धक्का दिला आहे. कमी किमतीत अधिक उपयुक्त, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून एखादी गोष्ट विकसनशील देशात तयार होऊ शकते या कल्पनेनेच विकसित देश आश्चर्यचकित झाले आहेत. त्यातूनच ‘रिव्हर्स इनोव्हेशन’ अशी नवी चर्चा सुरू झाली आहे.


....तर इनोव्हेशनचे नवे युग भारतात सुरू होईल :
आपल्याला मात्र या सगळ्या चर्चेचा आपल्यासंदर्भात विचार करावा लागणार आहे. नव्या उत्पादन संकल्पना भारत आणि चीनमध्येच जन्माला येतील हे आता तिथल्या लोकांनीच मान्य केले असले तरी त्यासाठी परदेशी बहुराष्‍ट्रीय कंपन्या भारतात येऊन त्यांचा शोध आणि विकास करणार की आपणच त्याकडे लक्ष देणार, हा खरा प्रश्न आहे. आपल्या देशातील गरजा, हवामान, डोंगरद-या, ग्राहकांची किंमत देण्याची तयारी या सर्व गोष्टींचा विचार करून आपण जर शोधमोहीम हाती घेतली आणि त्यातून ग्रामीण भागातही सहज पोहोचू आणि विकू शकू अशी उत्पादने तयार केली तर इनोव्हेशनचे नवे युग भारतातच सुरू होईल. यात अशक्य काहीही नाही. युरोपात औद्योगिक क्रांती होईपर्यंत लोखंडापासून सर्व प्रकारच्या वस्तू भारतातूनच निर्यात होत होत्या. उत्पादनतंत्र बदलले आणि आपण गुलामगिरीत अडकलो म्हणून पूर्वीचे इनोव्हेशनचे युग संपले. आता स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनी तरी ते जागरूकपणे सुरू करायलाच हवे.
* मूळ वैज्ञानिक संशोधन भारतात, पण त्याचे उत्पादनात रूपांतर मात्र युरोप-अमेरिकेत, पेटंट्स घ्यायला हवेत :
गेल्या शंभर एक वर्षांचा इतिहास असे सांगतो की, मूळ वैज्ञानिक संशोधन भारतात झाले, पण त्याचे उत्पादनात रूपांतर मात्र युरोप-अमेरिकेत झाले. आता डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या पुढाकाराने भारतीय शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचे पेटंट्स घेऊन त्यांचा औद्योगिकदृष्ट्या विकास करायला लागले आहेत. या झालेल्या परिवर्तनामुळेच अंतरिक्ष तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे व स्फोटके यांसह अनेक क्षेत्रांत आपण आघाडी घेतली आहे आणि त्यातून आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत आपण उतरत आहोत. अमेरिकेत कोणत्याही क्षेत्रात एखादा नवा शोध लागला की त्याचा वापर लगेच इतर सर्व उत्पादन क्षेत्रात केला जातो. आपल्याकडे आजवर हे घडत नव्हते. आता आपल्या शास्त्रज्ञांच्या शोधांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनवाढीसाठीही होऊ लागला आहे.
* भांडवलशाही देशात किमान बेरोजगारी कायमच राहते व मंदीच्या काळात ती वाढते :
औद्योगिक जगताला धक्का देतील, परिवर्तन घडवतील अशा नव्या आर्थिक वा अन्य संकल्पना अमेरिकेतच मांडल्या जात असत. त्यासंबंधीचा नवा विचार हळूहळू आशिया खंडातही होऊ लागला आहे. सध्याची भांडवलशाही केन्सप्रणीत तत्त्वप्रणालीनुसार काम करते. त्यामुळे भांडवलशाही देशात किमान बेरोजगारी कायमच राहते. मंदीच्या काळात ती वाढते आणि मंदी सरताच कमी होते. पण बेरोजगारी संपूर्णपणे घालवू शकणारा विचार पाश्चात्त्य जगात अजून मांडला गेला नाही. भारतातही आपण कमी-अधिक प्रमाणात केन्सचाच मार्ग अनुसरतो आहोत.
* भारतात औद्योगिक दृष्टी विकसित व्हावी, पेटंटबाबत जागरूक राहावे :
जगात आतापर्यंत नव्याने लागलेल्या वैज्ञानिक शोधांचेच रूपांतर उत्पादनात होते असे मानले जात होते. सर्वच देशांत असणा-या पारंपरिक ज्ञानाकडे मात्र यासंदर्भात दुर्लक्षच झाले होते. भारतात तर पारंपरिक ज्ञान विपुल प्रमाणात, पण विस्कळीत अवस्थेत आहे. हळदीच्या पेटंटवरून झालेल्या प्रदीर्घ संघर्षात प्रथमच आपले या ज्ञानाकडे लक्ष गेले आणि त्यामधूनच पारंपरिक ज्ञानाचा शोध घेऊन त्याचा महाकाय कोश आता उभा राहत आहे. त्यामधून नव्या नव्या उत्पादन संधी निर्माण होत आहेत. देशभर विविध क्षेत्रांतील उत्तम कारागीर आजही उपलब्ध आहेत. पण त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी मात्र औद्योगिक नाही. या कारागिरांच्या कलेला आणि उत्पादनांना नव्या तंत्रज्ञानाची जोड दिली तर त्यांचे रूपांतर मोठ्या निर्यातक्षम उद्योगांत होऊ शकते.
एकविसावे शतक हे ज्ञानाचे शतक आहे. ज्याच्याजवळ उत्तम उत्पादनयोग्य संकल्पना असेल त्याला भांडवल पुरवणा-या नव्या संस्थाही उभ्या राहिल्या आहेत. जेवढ्या कल्पना अधिक तेवढ्या उत्पादनसंधी अधिक, हे सूत्र आपण लक्षात घेतले तर पुढील जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्वही आपण सर्वार्थाने करू शकू.
अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी प्रा. अनिल बोकील यांचे अर्थक्रांती मॉडेल, तर बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रा. वसंत पेठेंचे मॉडेल
ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्रा. वसंत पेठे यांनी भारतातील बेरोजगारी हटवू शकणारे नवे देशी मॉडेल लोकांसमोर ठेवले आहे. सध्या त्यावर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. भारतातील 73 टक्के बेरोजगारी ग्रामीण भागातील आहे. ती दूर करायला केन्सपेक्षा पेठे यांचे देशी मॉडेल उपयोगी ठरेल. आजची अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी प्रा. अनिल बोकील यांनीही ‘अर्थक्रांती’ नावाचे नवे मॉडेल मांडले आहे. केंद्र सरकारच्या वर्तुळातही त्यावर चर्चा सुरू असून विविध पक्षांनी त्याचे सादरीकरण पाहून त्याला अनुकूलता दर्शवली आहे.