आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नधान्य उत्पादन घटणार; कृषिमंत्री पवार यांचे मत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अपु-या पावसाने तांदूळ व इतर तृणधान्यांच्या उत्पादनाला फटका बसल्याने चालू पीक वर्षात (2012-13) धान्योत्पादनात 3.5 टक्के घट येण्याची शक्यता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वर्तवली. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांतील दुष्काळाचा फटका धान्य उत्पादनाला बसणार असल्याचे पवार म्हणाले.

राष्ट्रीय बियाणे संघटनेच्या परिसंवादात पवार यांनी हा अंदाज वर्तवला. ते म्हणाले, गेल्या पीक वर्षात (जुलै 2011 ते जून 2012) 259.32 दशलक्ष टन विक्रमी धान्योत्पादन झाले होते. यंदा दुष्काळ असला तरी 250 दशलक्ष टनांपेक्षा जास्त धान्य उत्पादन होईल. देशातील मागणी पूर्ण करण्यासाठी हे उत्पादन पुरेसे आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तसेच गुजरात, राजस्थान व कर्नाटकच्या काही भागात भीषण दुष्काळ आहे. त्याचा परिणाम धान्य उत्पादनावर झाला आहे.
कृषी विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या सुधारित अंदाजात 2012-13 या हंगामात तांदळाचे उत्पादन गेल्या हंगामातील 105.31 दशलक्ष टन या विक्रमी उत्पादनावरून 101.8 दशलक्ष टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली आहे, तर गव्हाचे उत्पादन 94.88 दशलक्ष टनांवरून 92 .3 दशलक्ष टनांवर येण्याचा अंदाज आहे. इतर तृणधान्यांचे उत्पादन 38.47 दशलक्ष टन राहील, असे या अंदाजात म्हटले आहे. गेल्या हंगामात इतर तृणधान्याचे उत्पादन 42.04 दशलक्ष टन झाले होते. कडधान्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या पीक हंगामात 17.09 दशलक्ष टन कडधान्याचे उत्पादन झाले होते. यंदा ते 17.58 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. गळीत धान्याच्या (तेलबिया) उत्पादनात किंचित घट होऊन ते 29.46 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. गहू आणि तांदूळ या मुख्य अन्नधान्यांच्या उत्पादनावर अपु-या पावसाचा परिणाम तीव्रतेने जाणवणार असल्याने उत्पादनात घट येणार आहे.

कापूस, ऊस घटणार - कापसाचे उत्पादन यंदा घसरणार आहे. गेल्या हंगामात 35.2 दशलक्ष गाठी एवढे कापूस उत्पादन झाले होते. यंदा ते 33.8 दशलक्ष गाठी होईल. उसाचे उत्पादनही 361 दशलक्ष टनांवरून 334.54 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याची शक्यता कृषी खात्याच्या अंदाजात व्यक्त केली आहे.