आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा पॉलिसी सुरू ठेवावी का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही वर्षांमध्ये मृत्युदरामध्ये घट झाली आहे. खासगी विमा कंपन्यांनी नवनवीन सुविधा असलेल्या आणि अधिक फायदेशीर विमा पॉलिसी सुरू केल्या आहेत. विमा नियंत्रकानेही संरक्षणाच्या सीमा वाढवल्या आहेत. त्यामुळे तुमच्यासमोर अधिक स्वस्त आणि चांगले पर्याय उपलब्ध होतात. मग नवीन पॉलिसी घेण्यासाठी जुनी पॉलिसी सरेंडर करावी का? याबाबत माहिती घेऊया.
आपली सध्याची पॉलिसी प्युअर टर्म प्लॅनची असेल. त्यात गुंतवणुकीचा पर्यायही जोडलेला असू शकतो. जर ती खरेच प्युअर टर्म प्लॅन असेल आणि खूप महागडी नसेल तर ती बदलण्याचा विचार चुकीचा ठरू शकतो. सध्याच्या हप्त्याची तुलना उपलब्ध असलेल्या दुस-या ऑनलाइन टर्म प्लॅनबरोबर करा. जर यातील फरक जास्त असेल, तर पॉलिसी सरेंडर करण्यासाठी किंवा सुरू ठेवण्यासाठी खाली दिलेल्या निकषांवर ती तपासून पाहावी. पण जर ती इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट प्लॅन असेल तर तुम्हाला चार्जेस स्ट्रक्चर, सरेंडर चार्जेस, लॉक इन पीरियड, फंड परफॉर्मन्स, स्पेशल फीचर, अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट आणि सध्याचे आरोग्य अशा तथ्यांचा बारकाईने विचार करायला हवा. त्यानंतर कोणताही निर्णय घ्या.
० चार्जेस स्ट्रक्चर : सामान्यपणे युलिप प्रॉडक्ट फ्रंट लोडेड असतात. सुरुवातीच्या काही वर्षांत चार्जेस अधिक असतात. तसेच सुरुवातीला गुंतवणूक 5 ते 6 टक्के असते. यात फक्त प्रीमियम, अलोकेशन चार्जेस आणि पॉलिसी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस याचा समावेश आहे. त्यामुळे युलिप्स खूप महागडे ठरतात आणि तुमचा नफा कमी करून टाकतात. जर तुमच्या पॉलिसीमधील गुंतवणूक 1 किंवा 2 टक्के होत असेल, तर पॉलिसी सुरू ठेवता येऊ शकते.
० लॉक इन पीरियड आणि सरेंडर चार्जेस : पॉलिसीमध्ये कोणत्याही कालावधीत सरेंडरची सुविधा आहे की वेटिंग पीरियड देण्यात आला आहे, हे पाहणे गरजेचे ठरेल. सामान्यपणे किमान तीन वर्षांचा लॉक इन कालावधी असतो. जर तुम्ही हा कालावधी ओलांडला असेल तर सरेंडर चार्जेस किती आहेत हे पाहावे. तुम्ही भरलेले हप्ते आणि सरेंडर चार्जेसची तुलना करावी.
०स्पेशल फीचर्स : काही विमा पॉलिसी, विशेषत: युलिपमध्ये मोठ्या कालावधीसाठी फायदेशीर ठरणारे फीचर्स असू शकतात. काही युलिप दहा वर्षांनंतर लॉयल्टी बोनस देतात. काही युलिपमध्ये मोठे एनएव्ही गॅरंटेड प्लॅन्स आहेत. गॅरंटी चार्जेसमुळे पॉलिसी अधिक महागड्या ठरू शकतात. पण गुंतवणुकीचा कालावधी पाहता चांगला परतावा मिळू शकतो.
०रिसर्च आणि अ‍ॅडव्हाइस : पर्सनल फायनान्ससाठी जागोइनव्हेस्टरडॉटकॉम सारख्या संकेतस्थळाची मदत घ्या. पॉलिसीवर रिसर्च करा. फायनान्शियल प्लॅनर्स आणि ब्लॉगर्स नियमितपणे अशा प्रकारच्या पॉलिसींच्या चांगल्या-वाईट पैलूंबाबत माहिती देत असतात. इन्शुरन्स पोर्टफोलिओच्या आकाराच्या आधारावर तुम्ही स्वतंत्र अ‍ॅडव्हायझर नियुक्त करून मार्गदर्शन घेऊ शकता.
० सध्याची स्थिती : जर सध्याची पॉलिसी सरेंडर केली, तर तुमचा इन्शुरन्स फंड कमी होईल का? जर तसे होणार असेल, तर नवीन पॉलिसी घेणार का? मधुमेह किंवा रक्तदाब असल्यास नवीन पॉलिसीमध्ये अडचणी येऊ शकतात.
०पर्यायी गुंतवणूक : तुम्ही पॉलिसी सरेंडर केली तर मिळालेल्या पैशाचे काय करणार? तसेच दरवर्षीची हप्त्याची रक्कमही वाचणार तर त्याचे काय करणार? जर तुम्ही 4 टक्के व्याज मिळणा-या बचत खात्यात पैसे ठेवणार असाल तर पॉलिसी सरेंडर करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तुम्ही फायनान्शियल कॅल्क्युलेटरर्सचा वापर करायला हवा. सध्याची पॉलिसी आणि पर्यायी गुंतवणुकीसह मॅच्युरिटी व्हॅल्यू आणि संभाव्य कॅश फ्लोचा अभ्यास करणेही गरजेचे ठरते.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.