आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्च्या साखरेच्या निर्यातीला सवलत देण्‍यास मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आर्थिक अडचणीच्या गाळपात अडकलेल्या साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या गटाने कच्च्या साखरेच्या निर्यातीला सवलत देण्यास मंजुरी दिली आहे. ही सवलत 40 लाख टनांपर्यंतच्या कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी असून त्याची मुदत दोन वर्षे असेल.साखर उद्योगाला भेडसावणा-या आर्थिक अडचणींवर उपाय शोधून काढण्यासाठी पंतप्रधानांनी एका समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ऊसउत्पादक शेतक-यांची रक्कम अदा करण्यासाठी बॅँक कर्जावर व्याज अनुदान देण्याचे अगोदरच जाहीर केले आहे. एक नवीन उत्पादन म्हणून कच्च्या साखरेच्या निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टीने सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन हंगामांसाठी 40 लाख टनांपर्यंतच्या निर्यातीसाठी ही सवलत देण्यात येणार असल्याचे अन्नमंत्री के. व्ही. थॉमस यांनी सांगितले.
या सवलतीचे स्वरूप वित्त मंत्रालयाकडून लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. या सवलतीचे धोरण जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार लागू होईल आणि त्याचा आढावा वेळोवळी घेण्यात येईल. सवलत प्रस्ताव पुढील बैठकीत चर्चेसाठी येणार असल्याचे ते म्हणाले. अन्नमंत्रालयाने कच्च्या साखरेसाठी प्रतिटन 2,390 रुपये सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्याचा भार केंद्र आणि राज्य सरकार विभागून घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु या
समितीने मात्र प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली नसून त्याचा फेरविचार करण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
किमतीवरून घोडे अडणार
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने प्रतिटन साडेतीन हजार रुपये सवलत द्यावी असे सुचविले आहे. जागतिक बाजारात साखरेच्या किमती सध्या प्रतिटन 22,500 रुपयांच्या आसपास असून उत्पादन खर्च प्रतिटन 26,500 रुपये आहे. त्यामुळे सध्या साखर निर्यातीमध्ये प्रतिटन 4,500 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे सध्याच्या या जागतिक बाजारातील किमती बघता साडेतीन हजार रुपये प्रतिटनांपेक्षा खालील सवलत किंमत साखर कारखान्यांसाठी योग्य ठरणार नाही, असे मत साखर व्यापा-यांनी व्यक्त केले आहे.
साखर उत्पादन 85.60 लाख टनांवर
देशातील साखर उत्पादनाने सध्या वेग घेतला आहे. नवीन वर्षातल्या 15 जानेवारीपर्यंत 484 साखर कारखान्यांनी सध्या सुरू असलेल्या गाळप हंगामाध्ये 85.50 लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षातल्या याच कालावधीतील साखर उत्पादनाशी तुलना करता पंधरा दिवसांपूर्वी असलेली 29 टक्के उत्पादन पोकळी आता कमी होऊन 21 टक्क्यांवर आली आहे.
गेल्या वर्षात याच कालावधीत 108 लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदाच्या जानेवारीतील 85.5 लाख टन साखर उत्पादन हे 31 डिसेंबर 2013 च्या शेवटच्या गाळप हंगामातील 80.32 लाख टनांच्या तुलनेत जास्त आहे.
साखर उत्पादन करणा-या राज्यांची स्थिती : (15 जानेवारीपर्यंत)
उत्तर प्रदेश : गाळप सुरू असलेल्या 119 कारखान्यांनी 19.80 लाख टन साखरचे उत्पादन केले असून जवळपास 224 लाख टन साखरचे गाळप झाले आहे. मागील वर्षाशी तुलना करा पंधरा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन 41 टक्क्यांनी कमी झाले होते; परंतु ही पोकळी आता कमी होऊन 28 टक्क्यांवर आली आहे.
महाराष्‍ट्र : गाळप सुरू असलेल्या 155 साखर कारखान्यांनी जवळपास 294 लाख टन उसाचे गाळप केले आहे. गेल्या वर्षात याच कालावधीत 163 साखर कारखान्यांनी 357 लाख टन ऊसाचे गाळप करून 37.70 लाख टन साखरचे उत्पादन केले होते. यंदाच्या 15 जानेवारीपर्यंत 31 लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
कर्नाटक : 58 साखर कारखान्यांनी 16 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षात याच कालावधीत 56 साखर कारखान्यांनी 20 लाख टन उत्पादन केले होते.
आंध्र प्रदेश : 41.5 टन ऊस गाळपातून राज्यात 3.85 लाख टन (मागील वर्षात 4.60 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षातील 35 कारखान्यांच्या तुलनेत यंदा 33 कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे.
तामिळनाडू : राज्याने गेल्या वर्षातल्या 4.90 लाख टनांच्या तुलनेत यंदा 2.80 लाख टन साखरचे उत्पादन केले आहे.