आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupee Become 5 Paisa Strong Against Doller Sensex Showed 64 Points Increment

खरेदीच्या वार्‍याने तेजी परतली; सेन्सेक्स 164 अंकांनी वधारला, निफ्टीतही वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक शेअर बाजारातील तेजीच्या वार्‍यामुळे भांडवली वस्तू, बॅँका, माहिती तंत्रज्ञान समभागांवर शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. परिणामी भांडवल बाजारात पुन्हा एकदा भक्कम तेजीचे वातावरण निर्माण होऊन सेन्सेक्सने गेल्या चार आठवड्यांत पहिल्यांदाच दणदणीत साप्ताहिक कमाई केली. गुरुवारी शेअर बाजार 186 अंकांनी गडगडला होता, परंतु शुक्रवारी सेन्सेक्स 20,600.58 अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. विशेष म्हणजे खरेदीच्या उत्साहामुळे तो आणखी 20,725.04 अंकांच्या कमाल पातळीवर गेला. दिवसअखेर सेन्सेक्सने 164.11 अंकांची वाढ नोंद करीत 20,700.75 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या सहा दिवसांत सेन्सेक्सने पाचव्यांदा चांगली कमाई केली आहे. या आठवड्यात सेन्सेक्सने 333.93 अंकांची कमाई केली. हंगामी अर्थसंकल्पानंतर बाजाराला दिलासा मिळाला असून नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. परंतु अगोदरच्या तीन आठवड्यांत प्रत्येक वेळा सेन्सेक्स सौदापूर्ती आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 64 अंकांनी वाढून 6155.45 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीनेदेखील गेल्या चार आठवड्यांत पहिल्यांदाच साप्ताहिक वाढ नोंदवली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये अमेरिकेच्या उत्पादन कामगिरीत पहिल्यांदाच चांगली सुधारणा झाल्यामुळे जगभरातील शेअर बाजारात तेजी आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेदेखील भारतीच्या आर्थिक वाढीबद्दल सकारात्मक आशावाद व्यक्त केला.