आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupee Closed At 3 Month Low Amid In Stock Market

बाजारात तेजीला गळती, सेन्सेक्स 414 अंकांनी आपटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक शेअर बाजारातील विक्रीमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने बड्या समभागांना लक्ष्य करीत सरसकट केलेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स 414 अंकांनी गडगडला. गेल्या तीन आठवड्यांमध्ये एकाच दिवसात सेन्सेक्सने मोठी आपटी खाल्ली आहे.
जागतिक बाजारात डॉलर अनेक चलनांच्या तुलनेत सशक्त झाला, त्याचप्रमाणे रुपयानेदेखील डॉलरच्या तुलनेत 61 रुपयांच्या खाली घसरून मधल्या सत्रात 61.17 अशी तीन महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने तेथील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आर्थिक मदतीचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार फेडरल रिझर्व्ह महिन्याला रोखे खरेदी करायची; परंतु या रोखे खरेदीमध्ये फेडरल रिझर्व्हने आणखी कपात केली. त्याचा मोठा धसका जगभरातील शेअर बाजारांनी घेतला आहे. या निर्णयामुळे उगवत्या बाजारपेठेत येणारा निधी आटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचाच परिणाम बाजारावर झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 25,753.92 अंकांच्या खालच्या पातळीवर उघडला. त्यानंतर बाजारात झालेल्या सरसकट विक्रीच्या मार्‍यात तो आणखी 25,459.13 अंकांच्या पातळीवर आला. दिवसअखेर सेन्सेक्स 414.15 अंकांनी गडगडत 25,480.84 अंकांच्या पातळीवर बंद झाला. आठ जुलैच्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या दिवशी 518 अंकांच्या मोठ्या अंकांनी घसरला होता, त्यानंतर आता इतकी मोठी आपटी खाल्ली आहे.

राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 118.70 अंकांनी घसरून 7,600 अंकांच्या पातळीच्या खाली गेला आणि दिवसअखेर निफ्टी 7602.60 अंकांच्या पातळीवर बंद झाला. युरोप आणि आशियाई शेअर बाजारातही नरमाई होती. काही कंपन्यांनी तिमाहीत खराब कामगिरी केल्याचाही बाजारावर परिणाम झाला. त्यामुळे तेल आणि वायू, धातू, ऊर्जा, भांडवली वस्तू, बँक, सार्वजनिक कंपन्यांवर विक्रीचा ताण आला.
टॉप लुझर्स
हिंदाल्को, गेल इंडिया, टाटा पॉवर, सिप्ला, एनटीपीसी, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, सेसा स्टरलाइट, एचडीएफसी, कोल इंडिया, टीसीएस, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, एल अँड टी, भेल, डॉ. रेड्डीज लॅब.
ग्लोबल इफेक्ट
जागतिक बाजारातील नरमाई आणि भौगोलिक राजकीय तणाव कायम असल्याचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे प्रमुख क्षेत्रांनी चांगली कामगिरी करूनदेखील त्याचा फायदा होऊ शकला नाही, असे मत कोटक सिक्युरिटीजचे प्रमुख दीपेन शहा यांनी व्यक्त केले.
पुढे काय
० शेअर बाजारात आलेली घसरण जागतिक कारणांमुळे आहे. अमेरिका फेडरल रिझर्व्हने रोखे करेदीत कपात केली आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसला
० गेल्या तीन महिन्यांपासून बाजार तेजीत आहे. आता काही प्रमाणात नफावसुली होईल, तसेच येत्या काही दिवसांत सरकार बाजाराशी निगडित काही विधेयके मांडणार आहे.
० सर्व घटना व बातम्यांवर नजर ठेवावी. आणखी घसरण झाल्यास गुंतवणुकीसाठी हाती पैसा ठेवावा. ज्या कंपन्यांचे फंडामेंटल्स उत्तम आहेत त्या समभागांना प्राधान्य द्यावे.
: विश्वनाथ बोदाडे, गुंतवणूक सल्लागार