आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपया पुन्हा ‘साठी’त, सेन्सेक्सची गटांगळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुन्हा एकदा गटांगळ्या खात 60 च्या खालच्या पातळीवर गेलेला रुपया, जैसे थे राहिलेले व्याजदर आणि त्याहीपेक्षा आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याचा व्यक्त करण्यात आलेला अंदाज या सगळ्या नकारात्मक घडामोडींनी बाजाराचा हिरमोड केला. परिणामी बाजारात झालेल्या तुफान विक्रीच्या मा-यात तेल आणि वायू, ऊर्जा, सार्वजनिक कंपन्या आणि वाहन समभागांना मोठा झटका बसून सेन्सेक्स 245 अंकांनी गडगडला.


सकाळच्या सत्रात बाजार सकारात्मक पातळीवर होता, परंतु रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदर जैसे थे राहिल्याने बाजाराची साफ निराशा झाली. सेन्सेक्स दिवसअखेर 244.94 अंकांनी घसरून 19,348.34 अंकांच्या तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक देखील 75.60 अंकांनी घसरून 5,800 अंकांच्या खाली म्हणजे 5755.05 अंकांच्या पातळीवर बंद झाला. एमसीएक्स एसएक्स निर्देशांक देखील 139.03 अंकांनी घसरला.


रिझर्व्ह बँकेच्या नाणेनिधी धोरणानंतर बाजारातील खरेदीचा उत्साह मावळला. कारण उरलेल्या सर्व सत्रांमध्ये बाजाराने घसरणीचा सूर लावला. रुपयाच्या तुलनेत डॉलरच्या मूल्यात जवळपास 1.5 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे तेल आणि वायू समभागांना विक्रीचा फटका बसला. त्याचप्रमाणे रुपयाच्या अवमूल्यनाला लगाम घालण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने कोणत्याही ठोस उपाययोजना जाहीर न केल्यामुळे देखील बाजाराची निराशा झाल्याचे मत इव्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नागजी रिटा यांनी व्यक्त केले. व्याजदर जैसे थे राहण्यापेक्षाही रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक विकासदराचा अंदाज घटवल्याचा बाजारावर जास्त नकारात्मक परिणाम झाल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. दुस-या बाजूला डॉ. रेड्डीज लॅब आणि एनटीपीसीच्या आर्थिक निकालांनी देखील बाजाराची साफ निराशा झाली.


बाजारातील विक्रीचा प्रामुख्याने तेल आणि वायू, स्थावर मालमत्ता, ऊर्जा आणि वाहन कंपन्यांच्या समभागांना मोठा फटका बसला.


हे समभाग गडगडले
रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदाल्को, गेल इंडिया, भारती एअरटेल, बजाज ऑटो, ओएनजीसी, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, भेल, हिंदुस्तान लिव्हर.