आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाचा खणखणाटच ठरवणार बाजाराची चाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठवड्यात तेजीच्या एका झुळकीनंतर बाजारात मोठी घसरण दिसून आली. अनेक उपायांनंतरही रुपया न स्थिरावणे व बाजार दिशाहीन असणे ही कारणे या घसरणीमागे आहेत. मागील आठवड्यातच मी म्हटल्याप्रमाणे प्रारंभीच्या काळात बाजारात तेजी येईल. त्याप्रमाणे सोमवारपर्यंत काही प्रमाणात सकारात्मक वातावरण होते. मात्र, मंगळवारी काहीच सकारात्मक संकेत न मिळाल्याने बाजार कोसळला.


लोकसभेत पारित झालेले अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे अर्थव्यवस्थेवर पडणारा मोठा आर्थिक ताण असल्याची बाजाराची धारणा आहे. महसुली तूट आटोक्यात ठेवण्यात येईल, असे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी वारंवार सांगितले. तसेच अर्थसंकल्पातील उद्दिष्टानुसार सकल राष्ट्रीय उत्पादन- जीडीपी 4.8 टक्के राखण्यात यशस्वी होऊ, असेही त्यांनी वारंवार सांगितले. सध्याचे संकट विश्वासाचे आहे, त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या या भाष्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास बसणे कठीणच आहे. त्याशिवाय अन्न सुरक्षा योजनेमुळे पुढील वर्षी अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव येणार आहे. त्यामुळे बाजारातील निराशा वाढली. यामुळे विदेशी संस्था बाजारातून पैसे काढून घेत आहेत. जोपर्यंत सरकार आणि रिझर्व्ह बँक दीर्घकालीन उपायांची संरचनात्मक पावले टाकत नाहीत तोपर्यंत वातावरण असेच राहील. या आठवड्याच्या शेवटी जीडीपीचे पहिल्या तिमाहीची आकडेवारी जाहीर होईल. मात्र, त्यातूनही फारसा दिलासा मिळण्याचे संकेत नाहीत. कारण हे आकडे निराशाजनक येण्याची शक्यता जास्त आहे. अमेरिका फेडरल रिझर्व्ह रोखे खरेदीत कपात करणार हे निश्चित आहे. याचाही दबाव भारतासह इतर देशांच्या बाजारात दिसून येईल. भारताची सार्वभौम रेटिंग घटण्याची शक्यता आहे. कारण बहुतेक रेटिंग संस्थांनी सध्याचे मानांकन जैसे थे राखले आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमती वाढताहेत. नजीकच्या काळात त्या उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू खात्यातील तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बाजारातील कल फारसा सुधारण्याची शक्यता कमी आहे. घसरणीच्या वातावरणात रुपयाच्या चालीवर बाजाराची वाटचाल अवलंबून राहील.


मध्यम कालावधीचा विचार केल्यास निफ्टी सध्या मंदीच्या पकडीत आहे. जोपर्यंत सरकारकडून पायाभूत सुधारणांबाबत धोरणात्मक पावले टाकण्यात येत नाहीत तोपर्यंत बाजारात विक्रीचा धडाका सुरूच राहील. या आठवड्यात निफ्टी 5246 च्या खाली बंद झाल्यास निर्देशांक 4828 पर्यंत खाली येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जोपर्यंत निफ्टीचा हा स्तर कायम राहील तोपर्यंत घाबरण्याचे काहीच कारण नाही. समजा ही पातळी सुटली तर 5191 वर निफ्टीला किरकोळ आधार आहे. मात्र या पातळीवर विक्री झाली तर ही पातळी टिकणार नाही. त्यानंतर 5123 वर त्याला आधार आहे. हाही फारसा मजबूत नाही. पुढील आधार 5031 वर मिळण्याची शक्यता आहे.
वरच्या दिशेने निफ्टीला 5414 या पातळीपर्यंत दखल घेण्याजोगा अडथळा नाही. याकडे गुंतवणूकदारांनी बारीक नजर ठेवायला हवी. ही पातळी ओलांडणे सकारात्मकतेचे लक्षण आहे.


बाजारात स्थैर्य येईपर्यंत छोट्या गुंतवणूकदारांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रतीक्षा करणे इष्ट. शॉर्टटर्म गुंतवणूकदारांसाठी बायोकॉन लिमिटेड, डाबर इंडिया आणि युनायटेड फॉस्फरस चार्टवर उत्तम दिसताहेत. बायोकॉनचा मागील बंद भाव 339.75 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 347 रुपये आणि स्टॉप लॉस 330 रुपये आहे. डाबर इंडियाचा मागील बंद भाव 157 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 161 रुपये आणि स्टॉप लॉस 151.50 रुपये आहे. तर युनायटेड फॉस्फरसचा मागील बंद भाव 142.40 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 147 रुपये आणि स्टॉप लॉस 135 रुपये आहे.

- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com
चे सीईओ आहेत.