आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाच्या चालीवर ठरणार शेअर बाजाराची दिशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपयाला सावरण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत नवे चैतन्य भरण्यासाठी वित्त मंत्रालयाने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा आहे. याच आशेवर मागील आठवड्यात (गुरुवार ते बुधवार) देशातील शेअर बाजार किंचित वाढीसह बंद झाले. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने 61.21 हा विक्रमी नीचांक नोंदवला. शुक्रवारी अमेरिकेतील रोजगारवाढीचे आकडे जाहीर झाले. त्यामुळे सोमवारी गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावला. रुपया आणि विदेशातून येणा-या पैशांचा ओघ यावरील गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेला. रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपानंतर रुपया सावरला असला तरी डॉलरच्या तुलनेत सोमवारी तो 60.61 वर बंद झाला.


रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने वायदा बाजारातील नियम कडक करण्यासारखी काही पावले उचलली. रिझर्व्ह बँकेने सोमवारी जारी केलेल्या निर्देशांनुसार बँकांच्या चलन वायदा आणि ऑप्शन्स व्यवहारात प्रोपायटरी ट्रेडिंग न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेत सरकारी तेल कंपन्यांनी एकाच बँकेकडून डॉलरची खरेदी करावी, असे आरबीआयने म्हटले आहे. सेबीनेही चलन वायदा व्यवहाराचे नियम कडक केले आहेत. अशा व्यवहारावर मिळणारा नफा दुपटीने वाढवण्यात आला आहे. याचाच अर्थ अशा व्यवहारांसाठी गुंतवणूकदाराला दुप्पट ब्रोकरेज द्यावे लागणार आहे. या उपायांमुळे मंगळवारी रुपया सावरल्याचे दिसले. एवढे मात्र खरे आहे की, रुपयाचे दैव सर्व बाजारासाठी निर्णायक ठरले आहे. त्यामुळे आगामी काळात रुपयाची चाल बाजाराची दिशा ठरवणार आहे.


दरम्यान, कंपन्यांच्या तिमाही आर्थिक निकालांचा हंगाम सुरू होत आहे. येत्या शुक्रवारी इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे निकाल जाहीर होणार आहेत. साहजिकच सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा त्या निकालाकडे लागले आहे. एप्रिल ते जून तिमाहीत या कंपनीचा नफा अंदाजापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कंपन्यांची खराव कामगिरीचा धक्का बाजारासाठी नवा नाही. ते बाजाराने गृहीत धरले आहे. अशात इन्फोसिसच्या निकालावर बाजाराची प्रतिक्रिया पाहणे नक्कीच औत्सुक्याचे आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख बाजारांत संमिश्र कल आहे. अमेरिकेत अकृषक क्षेत्रातील रोजगारात वाढीचे संकेत आहेत. तर फेडरल रिझर्व्हकडून रोखे खरेदी योजना मागे घेण्याची शक्यता दुणावली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेत महागाई वाढली आहे. मात्र, सध्या ती मर्यादेत आहे. याचा चीनच्या नाणेनिधी धोरणावर फारसा परिणाम होणार नाही. एकूण परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक स्थिती सकारात्मक आहे. आगामी काळात यात फारसा फरक पडण्याची शक्यता नाही.


सद्य:स्थितीत निफ्टी आता 5905 आणि 5756 या कक्षेत राहण्याची शक्यता आहे. निफ्टी या कक्षेबाहेर आल्यास बाजारातील कल स्पष्ट होईल. निफ्टीला वरच्या दिशेने 5865 पातळीवर अडथळा आहे. हा अडथळा पार केल्यास निफ्टीत आणखी तेजी दिसण्याची शक्यता आहे. निफ्टीला पुढील अडथळा 5905 वर होईल. हा अडथळा कल स्पष्ट करणारा आहे.


खालच्या दिशेने निफ्टीला 5831 वर पहिला आधार आहे. निफ्टीचे या पातळीखाली घसरणे निर्देशांकातील मंदीचे लक्षण असेल आणि पुढील आधार 5816 पातळीवर मिळेल. ही पातळी तुटल्यास बाजारात आणखी घसरणीची शक्यता आहे. त्यानंतरची आधार पातळी 5756 आहे. हा क्रिटिकल सपोर्ट मानण्यात येत आहे. शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात पंजाब नॅशनल बँक, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड आणि युनियन बँक चार्टवर उत्तम दिसताहेत. पीएनबीचा मागील बंद भाव 632.15 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 648 रुपये आणि स्टॉप लॉस 614 रुपये आहे. एल अँड टीचा मागील बंद भाव 1428.30 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 1454 रुपये आणि स्टॉप लॉस 1399 रुपये आहे, तर युनियन बँकेचा मागील बंद भाव 176.50 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 182 रुपये आणि स्टॉप लॉस 170 रुपये आहे.
लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com
चे सीईओ आहेत.