आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कानोसा बाजारपेठेचा: रुपयाचा झटका, सेन्सेक्सला फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉलरसमोर गटांगळ्या खाण्याच्या रुपयाच्या स्वभावात कोणताच फरक पडत नसल्याने गुंतवणूकदार अगोदरच जाम वैतागले आहेत. त्यातच मंगळवारी कहर करत रुपयाने आणखी एक विक्रमी नीचांकी पातळी गाठल्यानंतर मात्र बाजाराचा धीर सुटला. रुपयाच्या अवमूल्यनाचा राग बाजाराने चौफेर विक्रीच्या मारा करून व्यक्त केल्यामुळे सेन्सेक्स 449.22 अंकांची गटांगळी खात 19 हजार अंकांच्या पातळीखाली गेला. आजच्या विक्रीच्या फटक्याने भारताला ‘ट्रिलियन डॉलर क्लब’मधूनही काढता पाय घ्यावा लागला आहे.


शेअर बाजारात तशी सकाळपासूनच नरमाई होती. त्यातून डॉलरच्या तुलनेत रुपयाने 61.80 अशी विक्रमी नीचांकी पातळी गाठल्यामुळे सा-या दलाल स्ट्रीटचा मूडच निघून गेला. रुपयाच्या अवमूल्यनामुळे आयात खर्च वाढून चालू खात्यातील तूट आणखी फुगण्याची भीती बाजाराला वाटू लागली आहे. त्यामुळे बाजारात सपाटून झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 449.22 अंकांनी घसरून 18,733.04 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या दहा सत्रांमध्ये सेन्सेक्स जवळपास नऊ दिवस सतत घसरला. त्याला फक्त सोमवार अपवाद ठरला. परंतु मंगळवारची सेन्सेक्सची घसरण आणि रुपयाची घसरगुंडी यामुळे देशाचे बाजार भांडवल घसरून 60.18 लाख कोटी रुपयांवर आले आहे. थोडक्यात, डॉलरच्या तुलनेत 60.8 या चलन विनिमय दरानुसार हे बाजार भांडवल 989 अब्ज डॉलर नोंद झाले आहे. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 143.15 अंकांनी घसरून 5542.25 अंकांच्या पातळीवर बंद झाला.


कंपन्यांची पहिल्या तिमाहीतील खराब आर्थिक कामगिरी आणि त्यातच रुपयाची घसरण यामुळे बाजाराच्या चिंता वाढल्या आहेत. त्यातून मंगळवारी तर रुपयाने आणखी एक नीचांकी पातळी गाठल्यामुळे बाजाराच्या चिंतेत भर पडली असल्याचे मत कोटक सिक्युरिटीज संशोधन प्रमुख दीपेन शहा यांनी व्यक्त केले. बाजारात चौफेर झालेल्या विक्रीच्या मा-यात सर्व 13 क्षेत्रीय निर्देशांक गडगडले. त्यातून ग्राहकोपयोगी वस्तू, स्थावर मालमत्ता, बँक, धातू, ऊर्जा, रिफायनरी, सार्वजनिक उद्योग, भांडवली वस्तू, बहुराष्‍ट्रीय कंपन्या या समभागांनी बाजाराला आणखी खाली खेचले.
नॅशनल स्पॉट एक्स्चेंजमधील खळबळीचा देखील बाजारावर परिणाम झाला. जागतिक शेअर बाजारातील संमिश्र वातावरण, फेडरल रिझर्व्हने आर्थिक मदतकमी करण्याचे पुन्हा दिलेले संकेत या सगळ्या नकारात्मक घटनांची त्यात आणखी भर पडली.


टॉप लुझर्स
भेल, एचडीएफसी, स्टरलाइट इंड, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, बजाज ऑटो, ओएनजीसी, जिंदाल स्टील, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एल अँड टी