आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉलरकडून रुपयाची धुलाई, बाजारात घसरणीची दहीहंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सरकारच्या प्रयत्नांना दाद न देता डॉलरकडून रुपयाची धुलाई सुरूच आहे. मंगळवारी रुपयाने 66 ची पातळी पार करत नवा विक्रमी नीचांक गाठला. रुपयाच्या नीचांकाने दलाल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांच्या उत्साहावर पाणी पडले. जोरदार विक्रीच्या धडाक्याने सेन्सेक्स 590 अंकांनी कोसळून 18 हजारांखाली आला. रुपयाचा नीचांक आणि शेअर बाजारातील घसरणीने सराफा बाजारातील तेजीला उधाण आले. सोने 32 हजारांवर पोहोचले तर चांदीने 55 हजारांकडे वाटचाल केली.


रुपयाचा नीचांक : 66.30
आयातदार आणि बँकांकडून डॉलरला नव्याने मागणी आल्याने रुपयाचे पानिपत झाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 66.30 ही आजवरची विक्रमी नीचांकी पातळी गाठली. अन्नसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याने त्याच्या खर्चामुळे अर्थव्यवस्थेवर येणारा ताण आणि कच्च्या तेलाच्या किमती बॅरलमागे 113 डॉलरवर पोहोचल्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर झाला.


रूपया घसरणीने महागाईला निमंत्रण
० आयात महागणार
० डाळ, खाद्यतेल कडाडणार
० पेट्रोल, डिझेल, गॅस भडकणार
० विदेशी शिक्षणाचा खर्च वाढणार
० जीवनावश्यक वस्तू महागण्याची शक्यता
० चालू खात्यातील तूट वाढणार


कोणासाठी किती रुपये मोजावे लागणार
पाउंड 102.80
येन 67.76
युरो 88.36
डॉलर 66.30


सेन्सेक्स 18 हजारांखाली
लोकसभेत सोमवारी अन्नसुरक्षा विधेयक मंजूर झाले. मात्र त्यासाठी लागणा-या निधीच्या चिंतेने बाजाराचे पानिपत झाले. जोरदार विक्रीच्या धडाक्याने सेन्सेक्स 590.05 अंकांनी कोसळून 17,968.08 वर बंद झाला. निफ्टी 189.05 अंकांच्या घसरणीसह 5,287.45 वर स्थिरावला. बाजारातील या पडझडीत गुंतवणूकदारांचे 1.7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बाजारातील 13 पैकी 12 क्षेत्रीय निर्देशांकांत घसरण झाली. बँकिंग, भांडवली वस्तू आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक या तीन समभागांनी घसरणीत 251.54 अंकांचा वाटा उचलला.


पुढे काय : गुंतवणूकदारांनी आता नेमके काय करावे
शेअर बाजारातील सातत्याच्या अस्थैर्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावे याबाबत आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ बोदाडे यांनी दिलेली माहिती:
० गुंतवणूकदारांनी क्षमतेनुसार गुंतवणूक करावी
० नेहमी स्टॉप लॉस लावून व्यवहार करावा
० मंदीतच खरी संधी असते हे विसरू नये
० मोजक्या परंतु ज्यांचा पाया अत्यंत भक्कम आहे अशा कंपन्यांच्या समभागांत गुंतवणूक करावी
० बाजारातील प्रत्येक घसरणीला
गुंतवणूक करावी.
० जास्त लोभ बाळगू नये, जास्त घाबरून
जाऊ नये.
० नफ्यावर मर्यादा ठेवा, नुकसान मर्यादित होईल
० सर्व गरजांवरील खर्चानंतर उरलेला
पैसा गुंतवावा
० गुंतवणूक करण्यापूर्वी वित्तीय सल्लागार, बाजारातील जाणकाराचा सल्ला आवर्जून घ्यावा.
० अफवांवर विश्वास न ठेवता, जे बुद्धीला पटेल तेच निवडावे.


घसरणीची कारणे
० डॉलरकडून रुपयाची धुलाई, रुपयाचा नीचांक
० विदेशी गुंतवणूकदारांकडून समभागांची विक्री
० सिरियातील तणाव व अमेरिकेचे त्याबाबतचे भाष्य
० गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा
० सोन्यात गुंतवणूक वळवण्याकडे कल


आशिया, युरोपातही घसरण
सिरियातील तणाव आणि अमेरिकेने त्याबाबत केलेले भाष्य यामुळे जगभरातील प्रमुख शेअर बाजारांत घसरण दिसून आली. आशियातील सिंगापूर, तैवान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, जपान बाजारात मंदीचे वातावरण होते. तर युरोपातील फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन बाजारात प्रारंभी नकारात्मक वातावरण होते. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बाजारातून निधी काढून घेण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. सोमवारी एफआयआयनी 607.43 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.


177 समभागांनी गाठला 52 आठवड्यांचा नीचांक
शेअर बाजारात आलेल्या 590 अंकाच्या घसरणीचा फटका अनेक समभागांना बसला. मुंबई शेअर बाजारातील 177 समभागांनी मंगळवारी 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. अनेक ब्ल्यू चिप कंपन्यांना विक्रीचा फटका बसला. एचडीएफसी बँक, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि एसीसी या कंपन्यांनी वार्षिक पातळी गाठली. या उलट 47 समभागांनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. या पडझडीत गुंतवणूकदारांचे 1.7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.