आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाचा झटका, निर्यातीला फटका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत होत असलेल्या रुपयाच्या घसरणीमुळे लघु तसेच मध्यम कंपन्यांच्या (एसएमई) निर्यातीला फटका बसला आहे. त्यामुळे हे निर्यातदार खरेदीदारांशी दीर्घ मुदतीऐवजी कमी कालावधीचे करार करत आहेत. सध्या या एसएमई निर्यातदारांना ग्राहकांशी जास्त सौदेबाजी करावी लागते आहे. ज्यांचे चलन स्थिर आहे अशा चीनसारख्या देशाच्या तुलनेत, या परिस्थितीत आपली स्पर्धा करण्याची क्षमता कमी पडत आहे.


इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे निर्यातदार रजनीश गर्ग यांनी सांगितले, रुपयाच्या मूल्यातील चढ-उतारामुळे निर्यात बाजारात अनिश्चितता वाढते. अशा वेळी आमचा जास्त वेळ ग्राहकांशी सौदेबाजी करण्यातच जातो. सध्या तीन महिन्यांच्या करारांऐवजी त्यापेक्षा कमी कालावधीच्या करारांकडे कल आहे. त्यामुळे मागणी असूनही कमी ऑर्डर नोंद होत आहेत. रुपयाच्या चढ-उतारासाठी हेजिंगचा उपाय आहे. मात्र मोठ्या प्रमाणात उलाढाल असणारे याचा लाभ व्यवस्थित घेऊ शकतात. छोट्या निर्यातदारांसाठी हेजिंग फारशी उपयुक्त नाही. रुपयाची घसरण असो की मूल्यवाढ, त्यात सातत्य असणे आवश्यक असल्याचे गर्ग म्हणाले. गर्ग आखाती देशांत थेट तर युरोपात निर्यात हाऊसच्या माध्यमातून निर्यात करतात.
आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील देशांत जेनरिक औषधे निर्यात करणारे अविनाश राका म्हणाले, रुपयातील अस्थैर्यामुळे अनेकदा हातातील ऑर्डर जातात. ग्राहक औषधांसाठी दीर्घकाळ कराराला पसंती देतात. मात्र सद्य:स्थिती लक्षात घेता हे शक्य नाही. भांडवलाच्या चणचणीमुळे छोट्या निर्यातदारांना जोखीम पत्करता येत नाही. हेजिंगचे साधनही उपयुक्त नाही.


एसएमई निर्यातदार राजीव चावला यांनी सांगितले, रुपयाच्या किमतीतील अस्थैर्याला हेजिंगचा पर्याय आहे. कोणत्या निर्यातदाराने याचा कसा वापर करायचा हे निर्यातदारावर अवलंबून आहे. रुपयाच्या घसरणीमुळे ग्राहकांशी जास्त प्रमाणात घासाघीस करावी लागते.


सर्वाधिक परिणाम
० रुपयात झालेल्या 20 टक्के घसरणीचा सर्वाधिक फटका प्लास्टिक, केमिकल, रबर या क्षेत्रांना बसला आहे. या क्षेत्रातील खर्चात खूप वाढ झाली आहे. त्यामुळे निर्यात महाग झाली आहे. डॉलरच्या तुलनेत गेल्या वर्षभरात रुपयाची चांगलीच घसरण झाली आहे.
० मागणी असूनही कमी प्रमाणात ऑर्डर बुक कराव्या लागत आहेत.
० हेजिंगचे साधनही छोट्या निर्यातदारांसाठी उपयुक्त नाही.
एसएमई निर्यातदारांचे मत
० चीनसारख्या देशाच्या तुलनेत, या परिस्थितीत स्पर्धा करण्याची क्षमता कमी पडत आहे.