आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाचा डॉलरसमोर नवीन विक्रमी नीचांक, बाजारातील विक्रीचा ताण कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सरकारने उपाययोजना करूनही रुपयाने डॉलरसमोर नवीन विक्रमी नीचांक गाठल्याने बाजारातील विक्रीचा ताण कायम राहिला. रुपयाच्या मूल्यात नंतर थोडीफार सुधारणा होऊनही त्याचा काही फायदा झाला नाही. परिणामी चार दिवस झालेल्या सौद्यांमध्ये सेन्सेक्सने सलग तिस-या आठवड्यात आपटी खाल्ली.


रुपयाच्या सततच्या अवमूल्यनाची बाजाराला तीव्र चिंता लागली आहे. त्यातच सहा ऑगस्टला मधल्या सत्रात आणखी घसरून 61.80 अंकांच्या विक्रमी खालच्या पातळीवर आलेल्या रुपयाने मोठा धक्का दिला. रुपयाची घसरगुंडी अशीच राहिल्यास चालू आयात खर्च वाढून चालू खात्यातील तूट आणखी वाढण्याची भीती बाजाराला वाटत आहे. त्यामुळे रुपयाच्या घसरणीमुळेच दलाल स्ट्रीटवर नरमाईचे वातावरण होते. रुपयात थोडीफार सुधारणा होऊन तो 60.88 च्या पातळीवर बंद झाला तरी त्याचा फारसा फायदा बाजाराला झाला नाही.


एकीकडे रुपयाचे अवमूल्यन आणि दुस-या बाजूला विदेशी निधी संस्थांनी समभागांमधून निधी काढून घेण्याचादेखील नकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांवर झाला. ईदनिमित्त बाजाराचे कामकाज बंद राहिल्याने या छोटेखानी चार दिवसांच्या सप्ताहात विदेशी गुंतवणूकदारांनी 140.80 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.
नॅशनल स्पॉट एक्स्चेंजने वायदे व्यवहार स्थगित केल्यानंतर उद्भवलेला 5 हजार 600 कोटी रुपयांच्या देय रकमेचा पेचप्रसंग आणि एचएसबीसीच्या निर्देशांकात सेवा आणि उत्पादन क्षेत्राची वाढ खुंटल्याचे दिलेले संकेत याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 19,178.06 अंकांच्या पातळीवर उघडला. दिवसभरात 19,306.51 आणि 18,551.35 अंकांच्या पातळीत झुलल्यानंतर सेन्सेक्स साप्ताहिक आधारावर 374.68 अंकांनी घसरून 18,789.34 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या तीन आठवड्यांत सेन्सेक्सने जवळपास 1,360.51 अंकांची डुबकी लावली आहे. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 112.25 अंकांनी घसरून 5565.65 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीची गेल्या तीन आठवड्यांत 463.5 अंकांनी घसरगुंडी झाली आहे.


आठवड्याचे मानकरी
टॉप लुझर्स : भेल, सन फार्मा, टाटा पॉवर, एचडीएफसी, बजाज ऑटो, लार्सन अँड टुब्रो, स्टर्लाइट इंड, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, आयटीसी, भारती एअरटेल, इन्फोसिस, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक.
टॉप गेनर्स : जिंदाल स्टील, टाटा स्टील, एनटीपीसी, कोल इंडिया, हिंदाल्को, मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, सिप्ला, विप्रो, महिंद्रा अँड महिंद्रा.