आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाला तरतरी, सोन्याची भंबेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाच राज्यांतील निवडणूक निकालांचे भाकीत आणि अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारीने खुश झालेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात उत्साहाने खरेदी केली. त्यामुळे सलग दुस-या सत्रात शुक्रवारी बाजारात तेजी दिसून आली. तिकडे रुपयानेही डॉलरला धोपटत आपले मूल्य वाढवले. सराफा बाजारात सोने स्वस्त झाले. सेन्सेक्स आता 21 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी अशीच खरेदी सुरू ठेवली तर बाजारात तेजीचे संकेत आहेत.
सेन्सेक्स, निफ्टी वधारले
सलग दुस-या सत्रात बाजारात खरेदीचा जोर असल्याने सेन्सेक्स 38.72 अंकांनी वाढून 20,922.45 वर बंद झाला. निफ्टीने 18.8 अंकांच्या वाढीसह 6259.90 ही पातळी गाठली.
अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारीवर आता बाजाराची नजर आहे. ही आकडेवारी सकारात्मक आली तर फेडरल रिझर्व्ह रोखे खरेदीत कपात करण्याची शक्यता आहे. त्याचा बाजारावर नकारात्मक परिणाम होईल, असे निरीक्षण ब्रोकर्सनी नोंदवले. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 22 समभाग चमकले. आशियातील चीन, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवानच्या बाजारात घसरण, तर हाँगकाँग आणि जपानच्या बाजारात तेजी दिसून आली. युरोपातील प्रमुख बाजारात सकारात्मक कल होता. गुरुवारी सेन्सेक्सने 250 अंकाची वाढ नोंदवली होती. आता बाजाराचे लक्ष अमेरिकेकडे आहे.
रुपया 61.41, पाच आठवड्यांचा उच्चंक
विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून जोरदार खरेदी केल्याने आणि निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्याने रुपयाचा भाव शुक्रवारी वधारला. आंतरबँक विदेशी मुद्रा विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने 34 पैशांची कमाई करत 61.41 या पातळीपर्यंत मजल मारली. रुपयाचा हा पाच आठवड्यांचा उच्चांक आहे. रुपयाच्या स्थितीबाबत इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायझर्सचे सीईओ अभिषेक अल्पारी यांनी सांगितले, अमेरिकेतील अकृषी क्षेत्रातील रोजगारविषयक आकडेवारीवर बरेच अवलंबून आहे. ही आकडेवारी अपेक्षेपेक्षा जास्त आल्यास फेडरल रिझर्व्ह रोखे खरेदीत कपात करू शकते. त्यामुळे डॉलरला मागणी येण्याची शक्यता वाढते.
दिल्लीत सोने-चांदी घसरले
जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेत आणि मागणीचा अभाव यामुळे सराफ्यातील दोन्ही मौल्यवान धातूच्या किमती घसरल्या. राजधानी दिल्लीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 465 रुपयांनी घसरून 30,785 झाले. चांदी किलोमागे 200 रुपयांनी स्वस्त होऊन 43,600 झाली. न्यूयॉर्क बाजारात सोने औंसमागे 1.46 टक्क्यांनी घसरून 1225.10 डॉलर झाले.
अमेरिकेकडे लक्ष
बाजाराचे लक्ष आता अमेरिकेतील आर्थिक आकडेवारीवर आहे. तेथे आर्थिक सुधारणा दिसून आल्यास बाजारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
- दीपेन शहा, रिसर्च हेड, कोटक सिक्युरिटीज.