आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयात शानदार सुधारणा, डॉलरच्या तुलनेत 42 पैशांची कमाई करत 60.88 वर बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉलरच्या तुलनेत होणारी रुपयाची घसरण थांबवण्यासाठी सरकार ठोस पावले उचलण्याच्या शक्यतेने गुरुवारी रुपया सावरला. निर्यातदारांनी केलेली डॉलरची विक्री आणि जागतिक स्तरावर डॉलरची घसरण या दोन्ही बाबींमुळे रुपयाला आणखी बळ मिळाले. आंतर बँक विदेशी मुद्राविनिमय बाजारात रुपयाने 42 पैशांच्या कमाईसह 60.88 अशी पातळी गाठली. बुधवारी रुपयाने 61.30 असा नवा विक्रमी नीचांक नोंदवला होता. सकाळी एकसष्टीत असलेल्या रुपयाला आर्थिक व्यवहार सचिव अरविंद मायाराम यांच्या भाष्यामुळे दिलासा मिळाला. सरकार रुपया सावरण्यासाठी पावले उचलेल असे मायाराम यांनी रिझर्व्ह बँक मंडळाबरोबरच्या बैठकीनंतर सांगितले.


सरकारकडून उचलण्यात येणारे प्रत्येक सकारात्मक पाऊल रुपयाला बळकटी देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. असे पाऊल टाकल्यास रुपया घसरण भरून काढण्याची शक्यता आहे . अभिषेक गोयंका, सीईओ, इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायझर्स


सोने चकाकले, चांदीही चमकली
खालच्या पातळीत आलेल्या सोन्याची जोरदार खरेदी झाल्याने गुरुवारी सोने पुन्हा चकाकले. गेल्या तीन दिवसांत सोने 460 रुपयांनी घसरले होते. गुरुवारी सोन्याने तीन दिवसांतील घसरण मोडीत काढली. राजधानीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 160 रुपयांनी वाढून 28,500 रुपये झाले. चांदी किलोमागे 360 रुपयांच्या कमाईसह 41,770 वर पोहोचली. अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी अपेक्षित न आल्याने जागतिक बाजारात सोने वधारले. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे 0.8 टक्क्यांनी वधारून 1297.69 डॉलर झाले.