आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉलरची धुलाई, रुपया 63.20

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मागील सहा सत्रांपासून सातत्याने मार खाणा-या रुपयाने शुक्रवारी डॉलरची यथेच्छ धुलाई केली. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 135 पैशांची कमाई करत 63.20 अशी पातळी गाठली. गेल्या 10 वर्षांतील ही रुपयाच्या एका दिवसातील सर्वात मोठी दुस-या क्रमांकाची कमाई आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँकेने टाकलेली पावले आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी दिलेला दिलासा यामुळे रुपया सावरला.

गुरुवारी रुपयाने 65.56 असा आजवरचा नीचांक गाठला होता. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी घाबरू नका, रुपयाचे हे खरे मूल्य नसल्याचा दिलासा दिला होता. सरकार रुपयाची घसरण नियंत्रणासाठी प्रयत्न करत असून निराश होण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले होते. शुक्रवारी सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया 64.30 असा खुला झाला. शेअर बाजारातील घसरणीने रुपया 64.75 पर्यंत गडगडला होता. त्यानंतर मात्र रुपयाने 135 पैशांची शानदार कमाई करत 63.20 अशी उंची गाठली. शुक्रवारी एकाच सत्रात रुपयाचे मूल्य 2.09 टक्क्यांनी वाढले. ही दशकातील दुस-या क्रमांकाची कमाई आहे. यापूर्वी 18 मे 2009 रोजी रुपयाने 152 पैशांची कमाई केली होती.


रुपयाच्या मूल्यवृद्धीचे परिणाम
० आयात स्वस्त होणार
० डाळ, खाद्यतेलाच्या किमती कमी होणार
० पेट्रोल, डिझेल, गॅस स्वस्त होण्याची शक्यता
० जीवनावश्यक वस्तूंची महागाई कमी होणार
० चालू खात्यातील तूट कमी होण्यास मदत
० विदेशातील शिक्षण स्वस्त होणार
० निर्यात वाढणार

डॉलरची जोरदार विक्री
रिझर्व्ह बँकेच्या वतीने राष्ट्रीयीकृत बँकांनी शुक्रवारी डॉलरची जोरदार विक्री केली. फॉरेक्स बाजारातील अस्थैर्याबाबत सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे गांभीर्य लक्षात घेऊन काही कंपन्यांनीही डॉलरची विक्री केली. त्यामुळे रुपयाला बळ मिळाले.
अगम गुप्ता, एमडी. स्टॅँडर्ड चार्टर्ड बँक.