नवी दिल्ली, मुंबई - आयातदारांनी डॉलरची खरेदी केल्याचा मोठा फटका शुक्रवारी रुपयाच्या मू्ल्याला बसला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 63 पैशांनी घसरून 61.18 झाले. सराफा बाजारात मात्र मौल्यवान धातूंची तेजी कायम राहिली. सोने तोळ्यामागे पाच रुपयांनी वाढून 28,250 झाले. चांदी मात्र किलोमागे 50 रुपयांनी घसरून 44,850 झाली.
सराफा व्यापार्यांनी सांगितले, सणांचा हंगाम आल्याने किरकोळ व्यापारी तसेच दागिने घडवणार्यांकडून सोन्याला चांगली मागणी आहे.
जागतिक सराफा बाजारातील वातावरण सध्या सोन्याला अनुकूल आहे. लंडन सराफा बाजारात सोने औंसमागे (28.34 ग्रॅम) 0.20 टक्क्यांनी वाढून 1284.91 डॉलरवर पोहोचले. औद्योगिक क्षेत्र आणि नाणी बनवणार्यांकडून चांदीची मागणी घटल्याने चांदी किलोमागे 50 रुपयांनी घसरली.
देशात आता सणांचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंना आगामी काळात चांगली मागणी येण्याची शक्यता सराफा व्यापार्यांनी वर्तवली.
रुपयाची घसरगुंडी
आयातदारांनी डॉलरची खरेदी केल्याचा मोठा फटका शुक्रवारी रुपयाच्या मू्ल्याला बसला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 63 पैशांनी घसरून 61.18 झाले. रुपयाचा हा चार महिन्यांचा नीचांक आहे. जागतिक पातळीवर डॉलरचे मूल्य वाढण्याच्या शक्यतेने काही बँका तसेच डीलर्सनी डॉलरची केलेली खरेदी तसेच शेअर बाजारातील घसरणीचा फटका रुपयाला बसला.