आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपी बॅँकेचा प्रवास सारस्वत बँकेच्या दिशेने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रुपी सहकारी बॅँकेला आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी सहकारी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सारस्वत बॅँकेने तयारी दर्शवली आहे. कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसली, तरी रुपी बॅँकेच्या कर्मचार्‍यांनी काही अटींवर या विलीनीकरणाला संमती दिलेली असून प्रशासकांनीदेखील अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे रुपी बॅँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संचालक मंडळातील दुफळीमुळे दहा वर्षांपूर्वी सहकार क्षेत्रातील ही जुनी बॅँक अडचणीत आली. ठरवून दिलेली कर्जवसुली करण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने सहकारी क्षेत्रातील या जुन्या बॅँकेला तीन वेळा संधी दिली. ही कर्ज वसुली करण्यात अपयश आल्याने गेल्या दहा वर्षात तीन वेळा संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. डबघाईला आलेली आर्थिक स्थिती आणि कर्जवसुलीत येणाºया अडचणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बॅँकेने सहकारी संस्थांचे जॉइंट रजिस्ट्रार संजय भोसले आणि नागरी सहकारी बॅँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची रुपी सहकारी बॅँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली.

सारस्वत बॅँकेचे अध्यक्ष आणि खासदार एकनाथ ठाकूर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये काही ठरावीक अटींवर कर्मचार्‍यांनी रुपी बॅँकेचे सारस्वत बॅँकेमध्ये विलीनीकरण करण्यास संमती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

रुपी बॅँकेचे सारस्वत बॅँकेत विलीनीकरण करण्याची चर्चा सध्या प्राथमिक पातळीवर आहे. सारस्वत बॅँकेने आमच्याकडे विचारणा केल्यास त्याला आमचे सहकार्य असेल, परंतु अद्याप रिझर्व्ह बॅँकेची परवानगी मिळालेली नाही. विलीनीकरणासंदर्भातील हरकत नाही असे पत्र (ड्यू डिलिजन्स) पंधरा दिवसांपूर्वी सहकार आयुक्तांकडे दिले असल्याचे रुपी बॅँकेचे प्रशासक डॉ. संजयकुमार भोसले यांनी ‘दिव्य मराठी’ला माहिती देताना सांगितले.

ग्राहकांना दिलासा
रुपी सहकारी बॅँकेच्या ठेवी 1,409 कोटी रुपये असून कर्जवाटप 665 कोटी रुपयांचे झाले आहे. बॅँकेचा एकूण व्यवसाय 2 हजार कोटी रुपयांचा असून खातेदारांची संख्या 6 लाख 52 हजार आहे. या बॅँकेला सध्या 546.91 कोटी रुपयांचा तोटा दररोज सहन करावा लागत असून या बॅँकेत 900 कर्मचारी कार्यरत आहेत.सहकारी क्षेत्रातील अत्यंत जुनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बॅँकेत मध्यमवर्गीय पांढरपेशा ग्राहकांचे पैसे अडकले आहेत. सहकारी बॅँकिंग क्षेत्राबद्दल ग्राहकांच्या मनात साशंकता निर्माण झालेली असतानाच जर सारस्वत बॅकेचा आधार रुपीला मिळाल्यास तो मोठा दिलासा ठरेल असे ग्राहकांचे मत आहे.