आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूपयाची नीचांकी पातळीवर घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोमवारी डॉलरने रुपयाची यथेच्छ धुलाई केली. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाने 58.16 ही आजवरची नीचांकी पातळी गाठली. दिवसभरात रुपयात 110 पैशांची घसरण झाली. रुपयाच्या अवमूल्यनाने घाबरून जाऊ नये असा दिलासा वित्त मंत्रालयाने दिला. रुपयाच्या घसरणीमुळे आयात महागणार असून महागाईत भर पडणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या शक्यतेवर यामुळे पाणी पडले आहे.


डॉलरला आलेली मोठी मागणी आणि भांडवलाचा थंडावलेला ओघ यामुळे रुपयावर प्रचंड दबाब आला. या नकारात्मक वातावरणामुळे 30 एप्रिलपासून रुपयांत 8 टक्के घसरण झाली आहे. फॉरेक्स व्यापा-यांनी सांगितले, रुपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी सध्यातरी रिझर्व्ह बँकेकडून हस्तक्षेप होणार नाही. मात्र, मध्यवर्ती बँकेने रुपयाची पडझड थांबवावी अशी अपेक्षा आहे. विविध बँकांवर बंधने आणून मध्यवर्ती बँक रुपयाच्या अवमूल्यनाला काही अंशी आळा घालू शकते अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अशा अपेक्षा व्यक्त होत असल्या तरी डॉल विरुद्ध रुपया यात रिझर्व्ह बँक फारसा हस्तक्षेप करणार नसल्याचे संकेत नुकतेच आरबीआयचे गर्व्हनर डी. सुब्बाराव यांनी दिले आहेत.


परिणाम :
० आयात महागणार
० इंधनाच्या किमती वाढणार
० जीवनावश्यक वस्तूं कडाडणार
० रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीला खोडा बसणार
० चालू खात्यातील वित्तीय तूट वाढणार


रुपयाची एका दिवसांतील आजवरची विक्रमी घसरण
22 सप्टेंबर 2011 124 पैसे
12 नोव्हेंबर 2008 119 पैसे
10 जून 2013 110 पैसे


पॅनिक नको
जगातील सर्व चलनांची अशीच स्थिती आहे. रुपयाच्या घसरणीवरुन बाजारात पॅनिक आहे. ते अनावश्यक आहे.
अरविंद मायाराम, वित्त सचिव