नवी दिल्ली - सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या जामीन प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. अमेरिकेतील कंपनी मीराच कॅपिटलला दिलेल्या दोन अब्ज डॉलरच्या (सुमारे १२,२०० कोटी रुपये) रकमेतून जामिनाची रक्कम देणार असल्याचे सहारा समूहाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. सहाराच्या मते बँक ऑफ अमेरिका या व्यवहारात बँकर आहे. मात्र, बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान मीराच कॅपिटलने या प्रकरणात धोका दिला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असे सहाराने म्हटले आहे.
बँक ऑफ अमेरिकाने कानावर हात ठेवल्यानंतर मीराच कॅपिटलने बनावट कागदपत्रे दिल्याचे व मीराचवर फौजदारी दाखल करू असे सहाराने म्हटले आहे. मीराच कॅपिटल ही अनोळखी कंपनी आहे. भारतीय वंशाचे सारांश शर्मा हे याचे सीईओ आहेत. बँक ऑफ अमेरिकेच्या इन्काराबाबत त्यांनी काहीच भाष्य केले नाही. या व्यवहारासाठी बँक निश्चित झाली होती. सहाराकडून न्यूयॉर्क व लंडनमधील हॉटेलची खरेदी करू इच्छिणार्या मीराच कॅपिटलबरोबरचा सौदा मोडण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. सहारा समूहाचे न्यूयॉर्कमध्ये द प्लाझा आणि ड्रीम, तर लंडनमध्ये ग्रॉसवेनॉर हाउस ही हॉटेल्स आहेत.
सहाराचे पत्र : सहाराने ९ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात एक पत्र दिले आहे. बँक ऑफ अमेरिकाकडून सहारा परिवाराला आलेले हे पत्र आहे. त्यानुसार मीराच कॅपिटलच्या निर्देशानुसार १०५ कोटी डॉलरची (६,४०० कोटी रुपये) रक्कम २० फेब्रुवारीपर्यंत गोठवण्यात आली आहे. १५ डिसेंबर २०१४ च्या या पत्रानुसार अॅम्बे व्हॅली (मॉरिशस) लि. ला ६५ कोटी डॉलर आणि सहारा व्हॉस्पिटॅबिलिटीला ४० कोटी द्यायचे आहेत.
बँक ऑफ अमेरिकाचा इन्कार : बँकेने सांगितले, या प्रकरणात बँकर असल्याचे प्रसारमाध्यमातूनच कळले. तपासाअंती यात बँकेच्या नावाचा दुरुपयोग करण्यात आला असल्याचे बँकेने म्हटले आहे.
प्रकरण काय : गुंतवणूकदारांना २० हजार कोटी रुपये परत केले नसल्याच्या प्रकरणात सुब्रतो रॉय एक वर्षापासून कारागृहात आहेत. जामिनासाठी १० हजार कोटी जमा करण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने घातली आहे.