आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइल बाजारपेठेत सॅमसंगच स्मार्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विविध स्तरांतून ‘स्मार्टफोन’ला मिळत असलेल्या वाढत्या पसंतीमुळे देशातील मोबाइल हँडसेटच्या बाजारपेठेत वार्षिक आधारावर 14.17 टक्क्यांनी वाढ होऊन उलाढाल 35,946 कोटी रुपयांवर गेली असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. नोकिया’वर कडी करीत सॅमसंग हा पुन्हा एकदा टॉपचा ब्रँड ठरला आहे.

‘व्ही अँड डी 100’ने केलेल्या आपल्या 18 व्या वार्षिक सर्वेक्षणामध्ये आर्थिक वर्ष 2011-12 मधील 31,300 कोटी रुपयांच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षामध्ये मोबाइल हँडसेट बाजारपेठेने 35,946 कोटी रुपयांची उलाढाल केली असल्याचे म्हटले आहे.

गेल्या एका दशकापासून जास्त मोबाइल बाजारावर अधिराज्य गाजवणा-या नोकिया ब्रँडला मात्र आपले अव्वल स्थान गमावावे लागले असून त्या जागी आता सॅमसंगने आपले नाव कोरले आहे.

सॅमसंगच्या हँडसेटच्या किमती दीड हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत असून स्क्रीनमध्येदेखील विविध प्रकार आहेत. त्याशिवाय दर्जेदारपणा, नवीन फीचर्स सर्व स्तरांतील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणा-या असल्यामुळे सॅमसंग ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये सॅमसंगच्या महसुलात जवळपास 43.6 टक्क्यांनी वाढ होऊन तो 7,891 कोटी रुपयांवरून 11,328 कोटी रुपयांवर गेला आहे. इतकेच नाही, तर कंपनीने 31.5 टक्के बाजारहिस्सादेखील काबीज केला आहे. त्या उलट दुस-या स्थानावर ओल्या नोकियाच्या महसुलात 18 टक्क्यांनी घसरण होऊन बाजारहिस्सा 27.2 टक्क्यांवर गेला असल्याचे ‘व्हॉइस अँड डेटा’च्या अहवालात म्हटले आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात नोकियाला भारतीय कामकाजातून 9,780 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. त्या अगोदरच्या वर्षात हाच महसूल 11,925 कोटी रुपयांचा झाला होता. कानामागून येऊन तिखट झालेल्या मायक्रोमॅक्स या कंपनीने 3,138 कोटी रुपयांचा महसूल आणि 8.7 टक्के बाजारहिश्श्याची नोंद करीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.


ग्राहकांना हवेत स्वस्त अन मस्त फीचर फोन
ग्राहकांना स्वस्त फीचर फोन्स हवे असल्याचे मायक्रोमॅक्स, कार्बन, लाव्हा आणि झेन यांसारख्या स्थानिक मोबाइलच्या वाढत्या मागणीवरून स्पष्ट होते. आगामी काळात बाजारपेठेत येणा-या मोबाइलची दिशा याच कंपन्या निश्चित करणार आहेत .
इब्राहिम अहमद, समूह संपादक, व्हॉइस अँड डेटा