आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sandard And Poor Increases India Credit Number, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाची पत उंचावली, एस अँड पीने स्थिर पातळीवर आणले पतमानांकन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रात आलेल्या नव्या सरकारमध्ये आर्थिक सुधारणा राबवण्याची क्षमता असून त्यामुळे आपला देश सर्वाधिक आर्थिक वाढीची शिडी पुन्हा चढू शकतो, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच स्टँडर्ड अँड पुअर या जागतिक पतमानांकन संस्थेने भारताच्या पतमानांकनात सुधारणा करून तो नकारात्मक पातळीवरून स्थिर अशा वरच्या पातळीवर नेला आहे.

वास्तविक दरडोई जीडीपीचे प्रमाण प्रत्येक वर्षात ५.५ टक्क्यांवर गेले तसेच वित्तीय, महागाई तसेच अन्य महत्त्वाच्या गोष्टींमध्ये सुधारणा झाल्यास देशाच्या पतमानांकनात वाढ होण्याची शक्यता या जागतिक पतमानांकन संस्थेने व्यक्त केली आहे.

केंद्रात नव्याने निवडून आलेले सरकार विकासवाढीला चालना देण्यासाठी सुयोग्य अशा सुधारणा कार्यक्रम राबवेल अशी आशा असून, त्यामुळे वित्तीय कामगिरीतही सुधारणा होणार आहे. या गोष्टी लक्षात घेऊन देशाच्या पतमानांकनाचा दर्जा स्थिर असा उंचावण्यात आला असल्याचे एस अँड पीने म्हटले आहे.

एस अँड पीने भारताच्या सार्वभौम पतमानांकनाला ‘बीबीबी-/ ए-३’ असा पतदर्जा दिला असून दीर्घकालीन पतमानांकनाचा दर्जा नकारात्मकऐवजी स्थिर असा करण्यात आला आहे. या स्थिर दर्जामुळे सार्वभौम पतमानांकनात घट होण्याची जोखीम यामुळे कमी झाली आहे.
आर्थिक वाढीला चालना, चालू खात्यातील तुटीचे नियंत्रण तसेच रिझर्व्ह बँकेलाही सुलभ असे नाणेनिधी धोरण जाहीर करणे शक्य होऊ शकेल. या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करण्याची केंद्रातील नव्या सरकारची इच्छा आणि क्षमता डोळ्यासमोर ठेवून हा स्थिर पतदर्जा पुढील २४ महिन्यांसाठी कायम राहणार आहे.

रेटिंगवर मोदी इफेक्ट
मे महिन्यामध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी यांनी देशातील व्यावसायिक वातावरणात नवी जान टाकतानाच विदेशी थेट गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अगदी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेसह अनेक कार्यक्रम हाती घेतले. भारतामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका भेटीवर जाण्याच्या अगोदरच एस अँड पीने पतमानांकनाबाबतचा आपला सुधारित दृष्टिकोन व्यक्त केल्यामुळे महत्त्व निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेतल्या कॉर्पोरेट्सचीदेखील भेट घेणार आहेत. त्यामुळेही देशाच्या मानांकनावरदेखील मोदी इफेक्ट झालेला जाणवतोय.

...तर पतमानांकन घटू शकते
केंद्र सरकारने हाती घेतलेला रचनात्मक सुधारणा कार्यक्रम रखडला आणि अपेक्षित आर्थिक वाढ खुंटली किंवा वित्त आणि कर्ज प्रमाण सुधारले नाही तर मात्र हे पतमानांकन घटू शकते, असा इशाराही एस अँड पीने दिला आहे

उद्योग जगत खुश
एस अँड पीने पतमानांकनात सुधारणा केल्याने उद्योग जगताला दिलासा मिळाला आहे. रिलायन्स, टीसीएस, ओएनजीसी, एनटीपीसी, एनएचपीसी आदी कंपन्यांचे पतमानांकनही सुधारून स्थिर करण्यात आल्याचा फायदा त्या कंपन्यांना होणार आहे.पतमानांकन सुधारल्याने देशाकडे मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आकर्षित होईल असे मत जाणकारांनी व्यक्त केले. आयआयएफसी, आयआरएफसी, एक्झिम बँक व पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे रेटिंगही एस अँड पीने नकारात्मकवरून स्थिर केले.