आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Kale Artical On Heramb Sahstrabuddhe, Success Story.

यश कथा : मार्केटिंग इंडी इन लंडन व्हाया नाशिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी उद्योजकाचे लंडनमध्ये डिपार्टमेंटल स्टोअर. बड्या सुपरमार्केट, शॉपिंग मॉलला टक्कर देणारे. विश्वास बसत नाही ना यावर.. पण हे घडणार आहे. हेरंब सहस्रबुद्धे या मध्यमवर्गीय तरुणाने अडीच वर्षांपूर्वी आंतरराष्‍ट्रीय बाजारातील उद्योजक बनण्याचा जुगार मोठ्या धाडसाने खेळला. निश्चित ध्येय, दिशा आणि दूरदृष्टी याच्या बळावर हेरंबच्या आंतरराष्‍ट्रीय उद्योजकतेचा ‘मार्केटिंग इंडी इन लंडन व्हाया नाशिक’ हा प्रवास यशाची अंतरे कापत पुढे सुरू आहे.
युरोप मराठी साहित्य संमेलनातही मराठी उद्योजकांचा व्यापार मेळावा
व्यवसायाची गुरुकिल्ली कोणाला कुठे, कशी सापडेल हे काही सांगता येत नाही. हेरंबने बॉटनीत पदवी घेतल्यानंतर 1997 मध्ये नाशिकमध्ये अ‍ॅडव्हर्टायझिंग आणि इंडस्ट्रियल फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. नाशिक एमआयडीसीमधील बहुराष्‍ट्रीय तसेच लहान कंपन्यांच्या अंतर्गत जाहिराती, कॅटलॉग, टेक्निकल ब्रोशर्स, कॅटलॉग, मॅन्युअल आदींसाठी लागणा-या फोटोग्राफीची कामे तो करायचा. नाशिकमध्ये त्याने एक फोटो स्टुडिओही टाकला होता. 2000 ते 2008 या काळात हेरंबकडे नाशिकमधील वायनरीजची फोटोग्राफी, प्रेझेंटेशन, लेबल डिझायनिंगची कामे हाती आली आणि वाइन या नव्या क्षेत्राकडे तो आकर्षित झाला. वाइनचा आपल्या व्यवसायात कसा वापर करता येऊ शकेल याबद्दल कुतूहल निर्माण झाले. याच सुमारास भारताबाहेर जाऊन आपण स्वत:ला आजमावून पाहावे असा विचारही त्याच्या मनात घोळत होता. वाइन हे उत्पादन घेऊन आपण भारताबाहेर जाऊ शकतो हे डोक्यात फिट बसले .
शिक्षण, संशोधन आणि बाजार व्यवस्थापनातून व्यवसायाकडे
भारताबाहेर वाइनचे मार्केटिंग नीट होत नसल्याचे जाणवल्यावर याच संधीचा फायदा घेऊन भारताबाहेर जाण्याचे निश्चित केले. हेरंबने आपला मनोदय पत्नीकडे व्यक्त केला. मला आयुष्यातील एक मोठा जुगार खेळायचा आहे. त्यात मी यशस्वी झालो तर खूप पुढे जाईन. नाही झालो तर आपला स्टुडिओ आहेच. पत्नीने संमती दिली. पण आर्थिक पाठबळ नव्हते. मग स्वत:ची साठवलेली पुंजी आणि मित्राकडून पैसे उसने घेतले. सहा महिन्यांची बेगमी करून त्याने लंडन गाठले. लंडनमध्ये गेल्यावर ‘अर्न अ‍ॅँड लर्न’ या सूत्रानुसार अल्कोहोल क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्हिसल्स स्टॉक या कंपनीत नोकरी केली. या नोकरीत वाइनची किरकोळ विक्री कशी होते, तेथील वाइन पिण्याच्या आवडीनिवडी व सवयी याचे चांगले ज्ञान त्याला मिळाले. हे सुरू असतानाच दुसरीकडे त्याने ‘एमबीए इन इंटरनॅशनल मार्केटिंग’ हा दीड वर्षाचा अभ्यासक्रमपूर्ण केला. या माध्यमातून ‘ब्रिटन बाजारातील भारतीय वाइनचा प्रवेश आणि स्थिरता’ यावर संशोधन केले. लंडन चेंबर ऑफ कॉमर्समध्ये भारतीय वाईन्सवर व्याख्यान, सादरीकरणनंतर लंडन इंटरनॅशनल वाइन फेअरमध्ये भारतीय वाइनचे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली. अभ्यासक्रमात शिकलेल्या गोष्टींच्या माध्यमातून त्याने भारतीय वाइन्सचे एक प्रातिनिधिक नेतृत्व केले. परंतु शिकत असल्याने या गोष्टींचे व्यवसायात रूपांतर त्याला करता येत नव्हते.
ओळखी, मार्केटिंग, पर्यटन
एमबीए पूर्ण झाल्यानंतर डेझर्टेशनकरिता केलेल्या प्रकल्पाच्या वेळी वाइन रेस्टॉरंट आणि पुरवठादार यांचा चांगला परिचय झाला होता आणि त्यांनी भारतीय वाइन्सच्या बाबतीत रुची दाखवली होती. अखेर हेरंबने आपल्या व्यवसायाची खरी मुहूर्तमेढ रोवली ती ‘टॅँजेन्ट कन्सेप्ट लि.’ ही खासगी मर्यादित कंपनी सुरू करून. या कंपनीच्या माध्यमातून भारतीय वाइनबरोबरच वेब डिझाइन अ‍ॅप, पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम सुरू झाले. भारतीय पर्यटनाचे आंतरराष्‍ट्रीय स्तरावर योग्य ते प्रतिनिधित्व होत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने देशातील विशेष करून महाराष्‍ट्र पर्यटनाचे काम तेथे सुरू केले. याचाच एक भाग म्हणून मागील वर्षी मेमध्ये लंडनमध्ये भरवलेल्या आंबा महोत्सवाला लक्षणीय प्रतिसाद मिळाला. ख-या हापूसची चव लंडनकरांना चाखायला देऊन कोकण पर्यटनाचे महत्त्व त्यांना पटवून दिले. त्यामुळेच तेथील महापौरांनी पाच मे हा मॅँगो डे म्हणून साजरा करण्याचे जाहीर करणे हे हेरंबच्या प्रयत्नांचे यश म्हणावे लागेल. युरोप मराठी साहित्य संमेलनातही मराठी उद्योजकांचा व्यापार मेळावा ही संकल्पना पहिल्यांदा रुजवली. त्याला यश मिळवून ऑस्ट्रेलियातल्या संमेलनातही त्याची पुनरावृत्ती झाली.
वॉलमार्ट अमेरिकेतून भारतात, तर इंडी जगाच्या कोप-यात का जाऊ शकत नाही?
भारतातही आणि महाराष्‍ट्रातील उत्पादने लंडनमध्ये येत असली तरी ती कायमस्वरूपी मिळत राहणे महत्त्वाचे होते. कारण तेथील सुपरमार्केट, मॉल अगोदरच्या वाईट अनुभवांमुळे भारतीय वस्तूंना योग्य न्याय देत नव्हते. त्यातूनच ‘इंडी एक्स्प्रेस इंडिया’.. कम.. सीक, डिस्कव्हर’ ही संकल्पना त्याच्या डोक्यात आली. आता इंडी या एका खास दुकानाच्या माध्यमातून तो फक्त भारतीय बनावटीच्या वस्तूंना आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठ मिळवून देत आहे. यामध्ये कोकम सरबत, स्टेव्हिया, करवंद, आंबा या खाद्यवस्तूंबरोबरच कपडे, कॅलिग्राफी, ज्वेलरी, पेंटिंगही या दुकानात मांडण्यात येणार आहे. काही हजार चौरस फुटांचे हे दुकान उभारण्यासाठी जागेचा शोधही झाला आहे. आता लवकरच त्याची उभारणी झाली आहे. हेरंब म्हणतो, प्रवास खूप मोठा असून इंडीची सुरुवात लंडनपासून झाली आहे. आज वॉलमार्ट अमेरिकेतून भारतात येऊ शकते तर इंडी जगाच्या कानाकोप-यात का जाऊ शकत नाही? ‘एकमेका सहाय्य करू, अवघे बनू श्रीमंत’ या ध्येयाने पुढे जात असलेल्या हेरंबची कंपनी जर पहिल्या वर्षी 36 लाख आणि दुस-या वर्षी ती 53 लाख पौंड उलाढाल करत असेल तर इंडीचे पंख जगभरात का नाही पसरणार ?