आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश कथा: प्रयत्ने वाळूचे कण रगडिता उलाढाल वाढे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई-वडील अशिक्षित. हाती जेमतेम दोन-तीन एकरांची जमीन. त्यामुळे शिकून नोकरी करण्यावाचून तरणोपाय नाही. तरीही जिद्दीतून लहानसा उद्योग उभारतात. मेहनतीने तो विस्तारत जातो. जागतिक आर्थिक पडझड, नंतर लेहमन ब्रदर्स आणि सध्याच्या मंदीच्या तडाख्यातही 23 कोटी रुपयांवर उलाढाल जाऊ शकते? हा प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारा आहे. ज्येष्ठ उद्योजक आणि सायक्लो उद्योग समूहाचे सर्वेसर्वा पांडुरंग शिंदे यांनी मात्र प्रयत्ने वाळूचे कण रगडिता उलाढालही वाढे हे सिद्ध करून दाखवले. विशेष म्हणजे स्वत:चे आजपर्यंतचे आयुष्य आणि कारखान्याचे चाक यांना योग्य प्रमाणात गती देण्याचे तंत्र खुबीने जपल्यामुळेच ही किमया घडू शकली. साता-यातील पाथखळ या खेडेगावी शिंदे यांचे अकरावीपर्यंतचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर क-हाडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.ई. डिप्लोमा, तर आयआयटी पवईमधून एम. टेक पदवी संपादन केली.
प्रारंभी गिअर बॉक्सचा कारखाना सुरू केला
घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेणे सोपे नव्हते. शिंदे यांनी दोन्ही कॉलेजांमधील मेसमध्ये नोकरी करून जेवणाचा खर्च वाचवला, तर अल्प उत्पन्न गटासाठी असलेली शिष्यवृत्ती या बळावर ते शिकले. वडील फारसे शिकले नसले, तरी मुलाने शिकून मोठे व्हावे, अशी तळमळ होती. वडिलांच्या मानसिक आधारामुळेच ते अभियांत्रिकी परीक्षेत सहाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले.
शिक्षण घेतल्यावर सुरुवातीला त्यांनी नोकरी केली; परंतु आयआयटीमध्येच शिंदे यांनी व्यवसायाची दिशा मनोमन पक्की केली होती. अखेर सातारा एमआयडीसीमध्ये यंत्रांसाठी लागणा-या गिअर बॉक्सचे उत्पादन करणारा एक छोटासा कारखाना सुरू केला. सुदैवाने राज्य सरकारच्या तंत्रज्ञान साहाय्यता योजनेतून मिळालेल्या कर्जाचा मोठा आधार त्यासाठी मिळाला. हा गिअर बॉक्स सायक्लॉइड तंत्रज्ञानावर आधारित असल्याने त्यांनी कंपनीचे नाव सायक्लो निश्चित केले. अखेर तीन कामगार आणि तीन लाखांच्या भांडवलावर व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
उलाढालीवर मंदीची संक्रांत
शिंदे यांच्या उलाढालीचा चढता आलेख म्हणजे 1989 मध्ये एक लाखानंतर 1985 मध्ये ती 25 लाख रुपयांवर गेली. लिमिटेड कंपनी स्थापन केल्यावर उलाढाल 2 कोटी 80 लाख आणि नंतर साडेपाच कोटींवर गेली; पण 2008 मध्ये अमेरिकेतील मंदीने उलाढालीचा आलेख झर्रकन खाली आला. त्यातूनही सावरत कर्जाची परतफेड पुन्हा विकासाच्या 12 ते 14 कोटींच्या घरात जात नाही तोच 2009 मध्ये लेहमन ब्रदर्सने गाठले; पण मंदीचे हे दुष्टचक्र शिंदे यांनी मोठ्या खुबीने भेदले. शिंदे यांच्या कंपनीत आज 200 कामगार असून उलाढाल 22 ते 23 कोटींवर गेली आहे. मंदीचा फरक इतकाच की पूर्वी अमेरिका, स्वीडनच्या निर्यातीचा 35 ते 40 टक्के वाटा आता 15 ते 20 टक्क्यांवर आला आहे.
शिंदे यांच्या व्यवसायातील ग्यानबाची मेख
० उद्योगात आर्थिक जुळवाजुळव करताना अडचणी येतातच, पण त्यासाठी निरंतर कष्ट करायला हवेत.
०मोठ्या समस्येवर पहिले घाव घालून त्याचे तुकडे करा. आधी सोप्या अडचणी दूर करा, बाकी आपोआप सुटतात.
० अडचणी आल्यास बॅँकांना दोष देणे चुकीचे, अडचणी निर्माण होण्यास आपणच जबाबदार असल्याचे मान्य करा. समस्यांवर मार्ग निघेल.
स्वत:च्या संशोधनातून
अभिनव उत्पादन
आपल्या स्वत:च्या संशोधकवृत्तीतून ‘सायक्लो स्पीड प्रोड्युसर’ हे उत्पादन आणि त्यासाठी लागणारे यंत्रही त्यांनीच विकसित केले. त्यांची गिअरलेस ट्रान्समिशन प्रणाली ही देशातल्या विद्युत पारेषण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण होती. कारण अशा प्रकारचे उत्पादन त्या वेळी अमेरिका आणि जर्मनीतच व्हायचे. शिंदे यांनी भारतीय बनावटीचे पहिले उत्पादन तयार करून एक प्रकारे देशाचे परकीय चलन वाचवण्यास मोठी मदत झाली. अर्थात, याची दखल घेऊन त्यांच्या संशोधनाबद्दल 1981 मध्ये त्यांना राष्‍ट्रीय संशोधन आणि विकास महामंडळातर्फे राष्‍ट्रीय संशोधन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
प्रायव्हेट कंपनी, जन्मगावीच उभारला दुसरा प्रकल्प
सुरुवातीच्या काळात गिअर बॉक्स उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात अनेक अडचणी आल्या; पण उत्पादनात सारखी सुधारणा करत त्यांनी एक अपेक्षित दर्जाची उंची गाठली; पण ग्राहकांचा उत्पादनांवर विश्वास बसला आणि मग त्यांनी मागे वळून बघितले नाही. जागा अपुरी पडू लागल्यावर पुढची झेप घेत आपल्या जन्मगावी पाथखळ येथेच दुसरा प्रकल्प सुरू करून खेड्याकडे चला संदेश सार्थ ठरवला. बँकांकडून आर्थिक मदत घेऊन पाथखळच्या माळरानावर ‘सायक्लो ट्रान्समिशन प्रा.लि.’ या कंपनीचे 1988 मध्ये प्रियरंजनदास मुन्शी आणि शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होऊन नव्या कारखान्याची चक्रे गतिमान झाली. दरम्यानच्या काळात सायक्लो मोटार्स ही आणखी एक कंपनी सुरू केली.