आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Kale Article About Agriculture, Divya Marathi

स्वत:ची शेती नाही, भाड्याने शेती घेऊनही नफा गेला 15 लाखांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशमुख यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडील सीमेन्समध्ये नोकरीला होते,पण संपामध्ये त्यांची नोकरी गेली. त्या वेळी गणेश आठवीत शिकत होता. वडिलांजवळच्या तुटपुंज्या रकमेतून दोन वर्षे कशी तरी गुजरान झाली. त्यामुळे गणेशला फक्त दहावीपर्यंतच शिक्षणाची मजल मारता आली. उन्हाळ्यात भेंडी लावायची आणि त्यातून येणार्‍या पैशातून पुढचे चारपाच महिने उदरनिर्वाह चालायचा. गणेशची आई जळगावच्या सधन शेतकरी कुटुंबातील असूनही घरातल्या अठराविश्वे दारिद्र्याबद्दल त्यांनी कधी तक्रार केली नाही. घरची परिस्थिती बघून चार भावंडांमध्ये मोठा असलेला गणेश छोट्या-मोठ्या मळ्यात कामे करू लागला. गावातील कपडे गोळा करून रात्री दहा ते बारा या वेळेत इस्त्रीचे काम आणि दिवसभर शेती असा गाडा हाकला जात होता.

चुलत भावाने दिलेल्या 30 रुपयांमधून गणेशने पत्र्याच्या पिंपाची कावड बनवली. या कावडीच्या मदतीने पहिल्यांदा गवाराची शेती केली. शेतीबद्दल पूर्णत: अज्ञान असल्याने बी लावले की शेंगा येतील मग विकू अशी गणेशची समजूत होती. कमी पाण्यात एका महिन्यात शेंगा येतात. पण गणेश देशमुख यांनी दररोज पाणी दिले. त्यामुळे साडेतीन महिन्यांनी शेंगांचे पीक आले त्यातून फक्त 300 रुपये मिळाले. हा गणेशचा पहिला अनुभव होता. त्यानंतरच्या वर्षात गणेशने थैलीत भेंडीची रोपे लावली आणि पावसाळ्यात ती जमिनीत पेरली. पीक चांगले आले. कमी पाण्यातही पीक चांगले घेता येऊ शकते हे त्यांना कळले. गणेश देशमुख यांनी एका व्यापार्‍याकडून नासके टोमॅटो आणले. या बिया स्वच्छ धुऊन राखेत वाळवून जमिनीत पेरल्या. गडी ठवेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने मित्राच्या मदतीनेच हे पीक घेतले. पण या वेळी चमत्कार झाला आणि टोमॅटोच्या शेतीतून 1998 मध्ये 70 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला.

मधल्या काळात 1991 मध्ये गणेशला वडिलांच्या जागेवर तात्पुरती नोकरी मिळाली. कंपनीतील सफाईच्या कामामुळे आधार मिळाला. पण तो फार काळ टिकला नाही. अनेक विनंत्या करूनही नोकरीत कायम न करता उलट काढून टाकले. त्याचवेळी गणेशने नोकरी न करता शेतीच करायची असा निर्णय घेतला. सीमेन्समधून मिळालेल्या दहा-बारा हजार रुपयांत सात हजारांचे शेतीचे इंजिन आणि पाइप घेतला. येथून गणेशच्या व्यावसायिक शेतीला प्रारंभ झाला. पहिल्यांदा टोमॅटोचे पीक घेतले परंतु पुन्हा अतिपाण्यामुळे पीक वाया गेले. कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रातील डॉ. मेहेंदळे यांनी कमी पाण्यात शेती करण्याचा दिलेला सल्ला कामी आला. शेती आंधळेपणाने न करता ते एक विज्ञान हे गणेशला पक्के समजले. मग काय पिके, त्यांचा प्रकार, पाणी, खते, रोग, असा संशोधनाचा धडाका लावला. यातूनच त्यांनी एका एकरातून तब्बल 50 टन टोमॅटो उत्पादन घेतले. टोमॅटो शेतीत त्यांची मास्टरी झाली. पण हळूहळू मजुरांची संख्या रोडावू लागली होती.

त्यांनी कलिंगड उत्पादन घेण्याचे ठरवले. पारंपरिक पद्धतीने लागवड न करता दोन ते अडीच किलो वजनाची कलिंगड लागवड करण्याची नवी शक्कल लढवली. हा प्रयोग यशस्वी झाला. कारण मॉल सुपर मार्केटमध्ये जाणार्‍या महिला मोठे कलिंगड घरी घेऊन जाऊ शकत नाही आणि आजच्या तिघाजणांच्या कुटुंबाला ते सहज पुरते. हायपरसिटी, रिलायन्स फ्रेशमध्ये पाठवलेल्या छोट्या कलिंगडाचे स्वागत झाले आणि चांगली मागणी आली. कलिंगड लागवडीसाठी गणेश देशमुख यांनी इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर केला. पेफर मचिंग तंत्राच्या मदतीने पिकाला आच्छादन केल्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होता. आच्छादनाला पाडलेल्या भोकातून बाहेर पडलेल्या बियांना ठिबक सिंचनाने पाणी दिले. त्यामुळे पाण्याची 70 टक्के बचत होऊन उत्पादन दीडपटीने वाढले.

बॅँक कर्जासाठी शेतकर्‍यांनी विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे तर तो मात्र कर्जमाफीलाच चिकटून बसतोय
गणेश देशमुख म्हणतात, बॅँक कधीही शेतकर्‍यावर चटकन विश्वास ठेवत नाही. मला 2005 मध्ये शेतीकर्ज माफ झाले होते तरीही कर्जाची परतफेड केली. या दोन लाखांच्या कर्जमाफीला चिकटून बसलो असतो तर भविष्यात अडचणी आल्या असत्या. पण त्या वेळी कर्ज फेडल्यामुळे आज बॅँक मला सात लाखांचे कर्जही सहज देते. त्यामुळे शेतकर्‍यांनी मुळात आपली विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे. प्रतिष्ठा मिळाली तर ती जपली पाहिजे. कोणतेही व्यवहार करताना प्रामाणिक राहून योग्य निर्णय घेतले तर शेतकरी म्हणून पश्चात्ताप करण्याची आयुष्यात वेळ येणार नाही. गमतीचा भाग म्हणजे देशमुख यांची स्वत:च्या मालकीची शेती नाही तर ती ते चक्क भाड्याने घेऊन करतात आणि ती ओसाड आणि पडीक जमिनीवर. आज त्यांच्या या शेतीतंत्राने त्यांचा नफा 15 लाख रुपयांवर गेला आहे. स्वत:ची शेती नसतानाही शेतीत अभिनव प्रयोगाद्वारे दिलेल्या योगदानाबद्दल झी टीव्हीचा प्रतिष्ठेचा अनन्य पुरस्कार त्यांना देण्यात आला तर अगदीच अलीकडेच नाशिकमध्ये इनोव्हेटिव्ह फार्मर म्हणून गौरवण्यात आले. गणेश देशमुख यांना एकवेळ विज्ञानाच्या संज्ञा येत नसतील, पण शेतीच्या दांडग्या अनुभवामुळे खोपोली येथील केंद्र सरकारच्या कृषी संशोधन केंद्रात व्याख्याता म्हणून आमंत्रित केले जाते. आधुनिक शेतीच्या प्रचारासाठी ते दहावीच्या मुलांनाही शेती शिकवत आहेत.

मॉलमधून दररोज 10 लाख रुपयांच्या भाजीपाल्याची मागणी
गणेश देशमुख यांनी या इस्रायली तंत्रज्ञानातून टोमॅटो, कलिंगड, सिमला मिरची (रंगीत), भाजीपाला अशी उत्पादने घ्यायला सुरुवात करून आता ती बिगबझार, रिलायन्स फ्रेश, हायपरसिटी अशा मोठ्या मॉल सुपरमार्केटला पाठवली जातात. मॉल्समधून दररोज 10 लाख रुपयांच्या भाजीपाल्याची मागणी आहे. परंतु गणेश देशमुख म्हणतात शेतकरी आधुनिक शेतीची कास न धरता ती विकण्याच्या मागे लागले आहेत. जागेला भाव मिळाल्याने हजारो वर्षे अन्न देणारी सोन्याची कोंबडी कापल्या जात असल्याचे दु:ख वाटते.

एककाळ असा होता की शेतकरी म्हणून गणेश देशमुख यांना कोणी मुलगी द्यायला तयार होत नव्हते. परंतु त्यांचा डोंबिवलील एका सुशिक्षित, सुस्वरुप मुलीबरोबर विवाह झाला. एक रुपयाचे कर्ज न घेता तिन्ही बहिणींची लग्न झाली. त्यांच्या मुलीही चांगल्या शिक्षण घेत आहेत. गुरु म्हणून लाभलेले सगुणा बागचे प्रयोगशील शेतकरी शेखर भडसावळे यांनी केलेले विचार परिवर्तन आणि इस्त्रायली तंत्रज्ञान हेच गणेश देशमुख यांच्या यशस्वीतेचे गमक म्हणता येईल.
गणेश देशमुख, वांगणी, ता. कर्जत, जि. ठाणे