आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Kale Article About Priya Parab, Divya Marathi

उद्योजकतेचे पंख...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिया परब, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, विहान नॅचरल हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, उद्योजकता जर नसानसात भिनली असेल तर नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारे मन रमणार नाही. त्यातून आपल्या उद्योजकतेच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून त्यादृष्टीने धडपड कायम सुरू ठेवली तर व्यवसायात यश मिळवता येते. इतकेच नाही तर त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जाऊ शकते हे सिद्ध करून दाखवलेय ते मुलुंडमधील 44 वर्षीय उद्योजिका प्रिया परब यांनी.

आपल्या कारकीर्दीची 15 वर्षे कॉर्पोरेट जगतात व्यतीत केली :
प्रिया परब यांनी आपल्या कारकीर्दीची 15 वर्षे कॉर्पोरेट जगतात व्यतीत केली. व्यवस्थापनाचा अभ्याक्रम पूर्ण झाल्यानंतर सिटीकॉर्प, फेडरल एक्स्प्रेस, द टाइम्स ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस बॅँक, सर्व्हकॉर्प या ठिकाणी उच्चपदाच्या जबाबदार्‍या संभाळल्या. सिटी बॅँकेत नोकरी करताना काही तरी वेगळं करावे, असे त्यांना सारखे वाटत होते. त्यामुळे सिटी बॅँकेतील नोकरीला रामराम करून त्या द्राक्ष निर्यातीमध्ये उतरल्या. पण जम बसला नाही. त्यानंतर फेडेक्स कुरिअर कपनीतील नोकरीतही उद्योजकीय ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ही नोकरीदेखील सोडली आणि दिराबरोबर टीआय सायकलचा व्यवसाय सुरू केला. वेगळेपणाच्या शोधात असलेल्या प्रिया परब यांचे मन या व्यवसायातही रमले नाही अखेर त्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये रुजू झाल्या.

... आणि त्यांची उद्योजकीय वाटचाल सुरू झाली :
नोकरी व्यवसायाचा आलटून पालटून खेळ सुरू असतानाच दुसर्‍या बाजूला दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारीही पार पाडत होत्या. त्यातच जन्मापासून अस्थमा असलेल्या त्यांच्या लहान मुलांना कृत्रिम स्वादाची अ‍ॅलर्जी होती. नैसर्गिक आणि पौष्टिक उत्पादने त्या वेळी बाजारात फारशी उपलब्ध नव्हती. पण प्रिया यांच्या ‘पणजीबार्इंच्या बटव्या’त अशा बर्‍याच पारंपरिक रेसिपी होत्या. प्रियाने त्याचा शोध घेतला. मग आपल्या दोन्ही मुलांसाठी नैसर्गिक गुणधर्मांनीयुक्त अशी पौष्टिक पेज द्यायला सुरुवात केली. त्याचा अपेक्षित चांगला परिणाम झाला आणि मुलांकडून त्याला पसंती मिळाली. अशाच प्रकारची उत्पादने आपणच का बनवू नये असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांची खर्‍या अर्थाने उद्योजकीय वाटचाल सुरू झाली. व्यवसायात जम बसण्यास सुरुवात झाल्यावर मग त्यांनी टाइम्सची चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली.

प्रिया परब यांनी ‘विहान नॅचरल हेल्थकेअर’ या कंपनीच्या माध्यमातून ‘स्ट्रॉम्ब्स’ म्हणजे ‘स्ट्रॉँग बॉडी अ‍ॅँड माइंड’ या उत्पादनाची निर्मिती सुरू केली :
आजकालच्या लहान मुलांना पौष्टिक पदार्थ दिले तर तोंड वेंगाडली जातात पण जंकफुड्स आणि फास्टफूड चटकन फस्त होतात. या बाहेरच्या खाद्यपदार्थांचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे मुलांच्या निरोगी आणि सुदृढ वाढीसाठी प्रिया परब यांनी ‘विहान नॅचरल हेल्थकेअर’ या कंपनीच्या माध्यमातून ‘स्ट्रॉम्ब्स’ म्हणजे ‘स्ट्रॉँग बॉडी अ‍ॅँड माइंड’ या उत्पादनाची निर्मिती सुरू केली. कुठलाही व्यवसाय करायचा तर भांडवल ही मोठी अडचण असते.सुरुवातीला कारखाना काढणेही सोपे नव्हते. मग त्यावर उपाय म्हणून परब यांनी भारतीय अन्न औषध प्रशासनाच्या सल्ल्याने कच्चा माल आणून लहान प्रमाणावर उत्पादनाला सुरुवात केली. या उत्पादनाला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यादृष्टीने खूप अभ्यास तसेच संशोधन आणि विकासावर वेळ खर्च केला. उत्पादन तयार असले तरी बाजारात त्याला प्रतिसाद मिळणे सर्वप्रथम गरजेचे असते. त्यामुळे परब यांनी सुरुवातीला उत्पादनाचे नमुने सॅशे पॅकमध्ये तयार करून त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. तसेच मॉल आणि अन्य दुकानांमध्ये येणार्‍या ग्राहकांना चवीसाठी ही उत्पादने ठेवली. सॅम्पलिंगची ही कल्पना लक्षणीय यशस्वी झाली. त्यांच्या उत्पादनांना प्रतिसाद मिळू लागला. कालांतराने त्यांनी सर्व वयोगटाच्या व्यक्तींसाठीही हे उत्पादन सुरू केले.

डिसेंबर 2011 मध्ये त्यांनी मुलुंडमध्ये कारखाना सुरू केला. आपल्या या स्वप्नातील प्रकल्पाला यशोशिखरावर घेऊन जाण्याअगोदर संशोधन, उत्पादन विकास, बाजाराची चाचणी, उत्पादन क्षमतांची उभारणी या महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी पाच वर्षे कसून मेहनत घेतली. या कारखान्यात सात वर्षांखालील मुलांसाठी ‘स्ट्रॉम्ब्स पॉरेज’ (पेज) तसेच त्यापेक्षा जास्त वयोगटातील मुलांसाठी ‘स्ट्रॉम्ब्स अ‍ॅक्टिव्ह’ आणि मोठ्यांसाठी ‘स्ट्रॉम्ब्स डाएट’ अशा तीन उत्पादनांची निर्मिती सुरू केली. पारंपरिक पोषक खाद्यपदार्थांना आजच्या आधुनिक ‘इझी टू इट’ स्वरूपात बाजारात आणणे ही त्यांच्या उत्पादनाची खासियत म्हणता येईल. अगदी महिन्याच्या बाळापासून ते नव्वदीच्या पुढच्या व्यक्तींसाठी असलेल्या या उत्पादनांना गेल्या सहा वर्षात चांगलीच मागणी वाढली. त्यामुळेच आज त्यांची उत्पादने ऑनलाइन उपलब्ध तर आहेतच, पण काही प्रमुख रिटेल दुकानांमध्ये त्याचप्रमाणे देशपातळीवर उपलब्ध आहेत.

सामाजिक आणि उद्योजकीय माहिती अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचली :
प्रिया परब उद्योजिका तर आहेतच पण आपल्या व्यवसायासोबत समाजकल्याणाचेही काम त्या करतात. नुसता नफा कमावण्याचे उद्दिष्ट न ठेवता आपल्या उत्पन्नातला काही भाग त्या गरीब आणि कुपोषित मुलांच्या मदतीसाठी देतात. प्रिया परब ‘ द इंडस आंत्रप्रेन्युअर’ या सामाजिक संस्थेच्या सभासद असल्याने त्यांची ही सामाजिक आणि उद्योजकीय माहिती अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2009 मध्ये कैरोमध्ये केलेल्या भाषणामध्ये जगातल्या प्रत्येक देशातल्या उद्योजकांना ‘आंत्रप्रेन्युअर एक्स्चेंज प्रोग्रॅम’ या कार्यक्रमांतर्गत एकत्र आणण्याची कल्पना मांडली. आपल्या मिळकतीमधील काही भाग समाजसेवेसाठी देणार्‍या उद्योजकांचा शोध घेण्यासही सांगितले. त्यामुळे परब यांच्या या दोन्ही कार्याची दखल घेऊन जानेवारी 2010मध्ये त्यांना अमेरिकेचे निमंत्रण आले.आपल्या उद्योजक म्हणून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हा त्यांच्यासाठी मोठा बहुमान होता. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एका चर्चा सत्रात वेगवेगळ्या देशांतून आलेल्या 30 उद्योजकांमध्ये परब या एक होत्या. या चर्चासत्रानंतर सॅनफ्रॅन्सिस्को, न्यूयॉर्क, स्कॉट या शहरांमध्येही चर्चा सत्रे झाली.

माझी मुलेच माझ्या व्यवसायाचे प्रेरणास्थान :
वर्ल्ड लर्निंग ऑर्गनायझेशन आणि आंत्रप्रेन्युअर ऑर्गनायझेशन या अमेरिकेतल्या संस्थेच्या माध्यमातून देण्यात आलेली व्यावसायिक माहिती, स्थानिक उद्योजकांबरोबर चर्चा, विविध विद्यापीठांना भेटी देणे या सगळ्या गोष्टींमुळे परब यांना खूप काही शिकायला मिळाले. त्याचा उपयोग त्यांनी आपल्या व्यवसायात प्रकर्षाने करून घेतला. समाजकल्याणाकडे जास्त कल असलेल्या परब यांनी आपल्या कारखान्यात गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मी बनवलेल्या घरगुती व पौष्टिक पदार्थांना माझ्या मुलाकडून पहिली पसंती मिळाली. त्यामुळे माझी मुलेच माझ्या व्यवसायाचे प्रेरणास्थान असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.