आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेंबे थेंबे उद्योजक बने, दोन कोटींवर उलाढाल वाढे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असे म्हणतात. अपयशाच्या अशा कितीही पायर्‍या चढाव्या लागल्या तरी अंतिम पायरी ही यशोशिखराचीच असते, हे रमाकांत बारी यांच्या उद्योजकीय प्रवासावरून दिसून येते. केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेताना ब्लॅकलिस्टमध्ये गेलेले बारी हे आज त्याच महाविद्यालयाच्या पॅनलवरील एक मान्यवर व्यक्ती आहेत. इतकेच नाही तर जल प्रक्रिया प्रकल्प, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण या महत्त्वाच्या क्षेत्रात भरारी घेत आपल्या अ‍ॅटलांटा इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीची उलाढाल दोन कोटींवर नेऊन बारी यांनी यशाच्या पायरीवरील आपली पकड आणखी घट्ट केली आहे.

पॉलिटेक्निकमध्ये ब्लॅकलिस्टमध्ये टाकणारे प्रा. सूर्यकांत नवले हेच बारी यांना गुरू म्हणून लाभले
पॉलिटेक्निकमध्ये ब्लॅकलिस्टमध्ये टाकणारे प्रा. सूर्यकांत नवले हेच बारी यांना गुरू म्हणून लाभले. व्यापार्‍याना रसायनांची माहिती नसते तरी ते व्यवसाय करतात. तुम्हीसुद्धा रसायने स्वत:च्या ब्रॅँडने विका या सल्ल्याने बारी यांना त्यांच्यातील उद्योजकाची जाणीव करून दिली. वडील नोकरी पेशातले, आई गृहिणी आणि घरात उद्योग व्यवसायाचे कोणतेही वातावरण नसताना बारी यांनी 1 मे 1997 रोजी 1600 रुपयांच्या भागभांडवलावर त्यांनी अ‍ॅटलांटाची स्थापना केली. लहान मोठी कामे मिळवत त्यांचा प्रवास सुरू असतानाच 26 जुलैच्या महाभयानक पावसात त्यांनी मागवलेली ट्रकभर तुरटी विरघळून गेली. पण सदैव सैनिका पुढेच जायचे हे त्यांचे धोरण होते. 26 जुलैच्या पुरात गोडाऊनही वाहून गेले. व्यवसाय शून्यावर आला होता. पण या वेळी टेर खेचणार्‍या मित्रांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.
त्यानंतर मग बारी यांनी मागे वळून बघितले नाही. आयात निर्यात, बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास करून त्यांनी आपला पाया आणखी भक्कम केला. त्यामुळे आज बारी हे सर्व काही पाण्यासाठी झगडणारे उद्योजक म्हणून ओळखले जातात. जल प्रक्रिया प्रकल्पांसाठी लागणारी रसायने, उपकरणांचे उत्पादन, विक्री आणि सेवा पुरवतात. या शिवाय फिल्टर मीडिया, रेझिन्स, आर ओ प्लॅँटस, इंडस्ट्रियल केमिकल्स, कुलिंग टॉवर आणि बॉयलर यांना लागणार्‍या साहित्याचा पुरवठा त्यांची कंपनी करते. संपूर्ण ठाणे शहराचे प्रदूषण मोजण्याचे तसेच म्हाडा आणि सिडकोच्या औरंगाबाद, नाशिकसह अन्य ठिकाणच्या साइट्सच्या हवा प्रदूषणची देखरेख, मुंबई महानगरपालिकेच्या पाण्याच्या प्रयोगशाळेसाठी उपकरणे पुरवणे अशी सर्व कामे केली जातात.

टाटा पॉवर, हाफकिन, ज्युपिटर हॉस्पिटल, बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन, महिंद्र अ‍ॅँड महिंद्र (नाशिक, इगतपुरी) सारख्या अनेक बड्या कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत. अलीकडेच बारी यांनी प्रतिष्ठेचे मानले जाणारे आयएसओ 900 हे प्रमाणपत्रही मिळाले. जल प्रक्रिया, प्रदूषण पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहे. अलीकडेच त्यांना उद्योगश्री पुरस्कारही मिळाला आहे.

इंग्रजी माध्यम जमले नाही, इंजिनिअरिंगच्या दोन्ही वर्षांत अपयश
दहावीला विज्ञान विषयात मिळालेल्या चांगल्या गुणांच्या बळावर रमाकांत यांनी श्रीराम पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला. इंग्रजी माध्यम न जमल्याने इंजिनिअरिंगच्या दोन्ही वर्षात अपयश पदरी आले आणि आईच्या नजरेतूनही उतरले. मधल्या काळात उडाणटप्पूपणाही वाढला. पाचव्या वर्षी डिप्लोमा झाल्यावर वडिलांनी त्यांना काकांच्या केमिकल फॅक्टरीत नोकरी करायला सांगितली. पण अवघ्या सहा महिन्यांत ती सोडली. नवीन ग्राहक मिळवल्यानंतरही कंपनीकडून इन्सेटिव्हज अगदी तुटपुंजे असल्यामुळे कंपनीतल्या वरिष्ठांशी वारंवार मतभेद व्हायचे त्यामुळे त्यांनी जवळपास 29 वेळा नोकर्‍या बदलल्या. नवीन नोकरी मिळवताना होणारी मनाची अवहेलना, घरच्यांची नाराजी, मित्रांकडून प्रत्येकवेळी साहेब नवीन व्हिजिटिंग कार्ड द्या, अशी टेर खेचल्या जात असल्यामुळे नैराश्यही येत होते. पण या सगळ्या नोकºया करताना प्रत्येक कारखान्यात जाऊन संशोधन विकास, प्रयोगशाळांना लागणारी रसायने आणि उपकरणे याची खडानखडा माहिती त्यांना झाली होती.

यशात कर्मचाºयांना न विसरणारा उद्योजक, कर्मचार्‍यांना घडवून आणला मुंबई - सुरत विमानप्रवास
रमाकांत बारी यांच्या यशस्वी वाटचालीत त्यांची पत्नी राजश्री या व्यवस्थापन आणि बॅँकिंगची कामे सांभाळून त्यांना मोलाची साथ देत आहेत. मागच्या वर्षी एक कोटी उलाढालीची नोंद केल्यानंतर ते कर्मचार्‍यांना विसरले नाहीत. या यशाचा आनंद कर्मचार्‍यांना मुंबई - सूरत विमानप्रवास घडवून त्यांनी साजरा केला. आता या आर्थिक वर्षात बारी यांची कंपनी दोन कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठणार आहे. ‘वॉटर ट्रीटमेंट पीपल, एव्हरी ड्रॉप काउंट’ या त्यांच्या व्हिजिटिंग कार्डावरील ओळीच ते पाणी या महत्त्वाच्या व्यवसायाबद्दल किती गंभीर आहेत हे सांगून जातात. त्यामुळे नजिकच्या काळातही ते कोटीच्या कोटी उड्डाणे घेणार यात शंका नाही.