आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलिकॉप्टर भाड्याने देण्याच्या व्यवसायात कोटीच्या कोटी उड्डाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसाय करायचाच म्हटला तर संधी अमाप असतात. फक्त त्या साध्य करताना आलेल्या अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने उभे राहिल्यास व्यवसायाच्या अनोख्या प्रांतातही कोटीच्या कोटी उड्डाणे घेत झेपावता येऊ शकते हे दाखवून दिले आहे ते मंदार भारदे या 33 वर्षांच्या युवकाने. बंदिस्त शेळीपालन, कांदा निर्यात यासारख्या सुरुवातीच्या व्यवसायातील गिरक्या चुकल्या तरी थेट हेलिकॉप्टर भाड्याने देण्याच्या व्यवसायात आज मंदार आकाशात यशस्वी उद्योजकतेच्या भरा-या मारत आहे. मुळात मनाला एखादी गोष्ट भिडली की ती पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ न बसणे हा मंदारचा स्वभाव. नाशिकच्या बीवायके कॉलेजमधून बीकॉम नंतर पॉलिटिकल सायन्सची पदवी घेतलेला मंदार मध्यमवर्गीय कुटुंबातील. आई-वडील सरकारी नोकरीत असल्याने व्यवसायाशी कोठेही सुतराम संबंध नव्हता. पण व्यवसाय करायचाच हे त्याने मनात पक्के केले होते. डॉक्युमेंटरी निर्माता म्हणून त्याची करिअरला ख-या अर्थाने सुरुवात झाली आणि नंतर एक मीडिया कंपनीदेखील स्थापन केली. परदेशातील विद्यापीठात वारी परंपरेचा अभ्यास व्हावा या तळमळीतून एक डॉक्युमेंटरी करण्याची कल्पना त्याच्या मनात आली. प्रसंगी खांद्यावर कॅमेरा घेऊन पंढरपूर-आळंदी वारीही केली. नाणेघाटातील चक्राकार दिसणा-या वारीचे चित्रीकरण करण्यासाठी नाशिकच्या शिवपार्वती प्रतिष्ठानचे डॉ. मो. स. गोसावी यांनी बीजभांडवल दिले आणि हेलिकॉप्टरने चित्रीकरण करण्याची परवानगीही दिली, परंतु ते मिळते कोठे, परवानगी कशी घ्यायची हेच माहिती नसल्याने हेलिकॉप्टरमधून चित्रीकरण करण्याचे स्वप्न अपुरे राहिले. पण याच अपु-या स्वप्नाने मंदारला भाडेतत्त्वावर हेलिकॉप्टर देण्याच्या व्यवसायाचे नवे स्वप्न दाखवले. ज्या अर्थी आपल्याला हेलिकॉप्टरचे गणित जमले नाही त्या अर्थी येथेच व्यवसायाची संधी असल्याची मनोमन खात्री पटली आणि मग काय, मंदारने लगेच स्वभावानुसार ते ‘एक्स्प्लोर’ करायला सुरुवात केली. ही वाट तशी सोपी नव्हती. सुरुवातीला दुकानाचा परवाना काढला. त्यात फक्त विमान, रेल्वे तिकिटे विकणे इतकाच समावेश होता. जुहू विमानतळावर अशा प्रकारे हेलिकॉप्टर भाड्याने दिली जातात हे कळल्यानंतर तो थेट तिकडे गेला. मला हेलिकॉप्टर व्यवसाय करायचा आहे, कोणाला भेटू? असे विचारूनदेखील आठ दिवस त्याला कोणी दाद दिली नाही. अखेर नवव्या दिवशी विमानतळावर आलेल्या एका मंत्र्यांच्या ताफ्यातून मार्ग काढत तो संबंधित अधिका-यांना जाऊन भेटला. भाड्याने देण्यासाठी कोटेशन कसे द्यायचे, भाडे आकारायचे कसे हे काहीही माहिती नव्हते. कसेतरी करून बाजारातून व्यवसाय मिळवला तरी दुर्दैवाने हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचे महागडे कोटेशन त्याचेच असायचे. बॉलीवूडच्या सेलिब्रिटींशी संपर्क साधला तर त्यांची अगोदरपासूनच हेलिकॉप्टरची व्यवस्था होती. थोडक्यात, त्या वेळी मंदारचे व्यवसायाचे हेलिकॉप्टर अडचणीच्या वातावरणात घिरट्या घालत होते. पण न डगमता त्याने प्रवास सुरू ठेवला.


हेलिकॉप्टरने एकदा तरी जायचेच, असा विचार करणारे लोक त्याने शोधून काढले. पण मंदारच्या व्यवसायाला खरी कलाटणी दिली तरी त्या वेळच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या प्रचार फे-यांनी. विशेषकरून कॉँग्रेस पक्षाने मंदारच्या ‘मॅब एव्हिएशन प्रायव्हेट लि.कडून हेलिकॉप्टरर्स भाड्याने मागवली. कॉँग्रेसच्या राज्यात तसेच राज्याबाहेरच्या प्रचारफे-यांच्या वेळापत्रकामध्ये मंदारच्या सूचनांचाही प्रामुख्याने विचार होऊ लागला. खुद्द कॉँग्रेसच्या कार्यालयातच मंदारच्या कंपनीला एव्हिएशन वॉर रूम बनवण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे हेलिकॉप्टरचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी बिनचूक अक्षांश रेखांशांची माहिती देणा-या जीपीएस प्रणालीमुळे इंधनाचे नियोजन करता आले. मग काय कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ठिकाणी प्रचारसभा घेणे कॉँग्रेसला शक्य झाले. या सर्व प्रचारामध्ये मंदारच्या कंपनीने 98 टक्के असा ‘सक्सेस रेश्यो’ नोंदवला. या निवडणुकांनी मंदारच्या व्यवसायाला खरा ब्रेक मिळाला.


राजकीय पक्ष, बॉलीवूडचे तारे-तारका, प्रीमियर शो, आणीबाणीच्या प्रसंगी वैद्यकीय सेवा अशा विविध प्रकारे मंदारची कंपनी अगदी तीनआसनी हेलिकॉप्टर्सपासून ते 250 आसनी विमानापर्यंत भाड्याने देते.


मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये चित्रीकरणासाठीदेखील हेलिकॉप्टर्स दिली जातात. मंदारच्या कार्यालयात प्रवेश केल्यावर ‘कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे’ हे वाक्य लक्ष वेधून घेते. पौराणिक दृष्टिकोनातून या वाक्याचे महत्त्व वेगळे असले तरी मंदारच्याच भाषेत सांगायचे तर उत्तर दिशा ही प्रगतीची सकारात्मक दिशा आहे. म्हणूनच तो म्हणतो, ‘खूप सारी उड्डाणे सकारात्मकतेकडे.’ हेलिकॉप्टर भाड्याने देणा-या मुंबईतल्या पहिल्या तीन कंपन्यांमध्ये ‘मॅब एव्हिएशन’ का आहे हे अर्थातच वेगळे सांगायला नको.


यशाची गुरुकिल्ली :
करिअर साध्य करण्यासाठी नाही, तर साकार करण्यासाठी करा. मनाला भावते तेच करा. ‘99.99 इज नॉट इक्वल टू 100’ हे सूत्र मनात भिनवा. शंभर टक्के अचूकता साध्य करण्यासाठी .1 टक्का कमी पडला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका.