आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या संधी : बँकांत नोकर्‍याच नोकर्‍या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया येत्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांची भरती करणार आहे. आपल्या सहयोगी बँकांचे कार्यक्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी एसबीआयने कर्मचारी भरतीची योजना आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयने आपल्या पाच सहयोगी बँकांतील लिपिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. यामुळे आगामी काळात रोजगाराच्या हजारो संधी मिळणार आहेत. एसबीआयने यंदाच्या जुलै-ऑगस्टमध्ये सुमारे ५५०० रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एसबीआयच्या सहयोगी बँकांत आता ७,६४४ लिपिक पदे भरण्याची तयारी सुरू आहे.

सर्वाधिक रिक्त पदे एसबीएचमध्ये
1> स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये सर्वाधिक २,५५६ पदांची भरती होणार आहे. यात अपंग आणि माजी सैनिक संवर्गासाठी आरक्षित पदांचा समावेश आहे.

2> एसबीआयच्या इतर सहयोगी बँकांपैकी, स्टेट बँक ऑफ पटियालामध्ये १५४१, स्टेट बँक ऑफ त्रावणकोरमध्ये १५२७, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूरमध्ये ११८८ आणि स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये ८५२ लिपिक पदे भरण्यात येणार आहेत.

९ डिसेंबरपर्यंत नोंदणीकरता येणार
या सर्व पदांसाठी बँकेने २० नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या ९ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या पदांसाठी येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना केवळ एकाच बँकेच्या व राज्यासाठी अर्ज करता येईल व ती परीक्षा संबंधित राज्यात होईल.

सेवानिवृत्ती व जन-धनमुळे वाढला ताण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जन-धन योजनेअंतर्गत येत्या फेब्रुवारीपर्यंत साडेसात कोटी बँक खाती उघडण्याची योजना आखली आहे. त्या दृष्टीने जोरात तयारी सुरू आहे. पंतप्रधानांचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना कर्मचार्‍यांची आवश्यकता भासणार आहे. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील इतर बँकांप्रमाणेच एसबीआय आणि तिच्या पाच सहयोगी बँकांत सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांमुळे अनेक जागा रिक्त होणार आहेत. तसेच जाळे विस्तारासाठी या बँकांना नवीन भरती करणे अत्यंत गरजेचे आहे.