आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seaplane Service To Take Off In Mumbai News In Marathi

सी-प्लेनद्वारे पर्यटन सुरू; वेळ वाचवणारी सोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील पहिल्यावहिल्या मोनोरेल प्रवासाचा आनंद घेत असतानाच आता सुखकर अशा जल विमान प्रवासाचा आनंदही मुंबईकर तसेच पर्यटनप्रेमींना उपलब्ध झाला आहे. मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा म्हणून पाण्यातून आकाशात भरारी घेणारी पहिली जल विमान वाहतूक सेवेचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर जुहू चौपाटीवरून अ‍ॅम्बे व्हॅलीच्या दिशेने या जल विमानाने पहिली भरारी घेतली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मरीन एनर्जी हेला एअर सर्व्हिसेस प्रा. लि. यांचा हा संयुक्त उपक्रमातून ही जल विमानवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या या सेवेचे उद्घाटन झाले असले तरी पाच मार्चपासून पर्यटकांना या विमानाचे आरक्षण करता येऊ शकणार आहे.

मुंबई ते अ‍ॅम्बे व्हॅली हे शंभर किलोमीटरचे अंतर केवळ 25 ते 28 मिनिटात कापणे शक्य होणार आहे. त्यामुळे रस्त्याने जाताना लागणारा वेळ जवळपास एक चतुर्थांश अवधीने कमी होणार आहे. मेहेरने गेल्या वर्षी केरळमध्ये पहिल्यांदा जल विमानसेवा सुरू केली होती. त्यानंतर आता ती महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी उपलब्ध झाली आहे.

पर्यटन खात्याचे राज्यमंत्री रणजित कांबळे, अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मुल्लीक, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील, एमटीडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी, मेहेरचे संचालक आणि सहसंस्थापक सिद्धार्थ वर्मा, अ‍ॅम्बे व्हॅलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुमार उपस्थित होते. धावपट्टीची गरज नसल्याने मुंबईच्या समुद्र किनार्‍यावरून उड्डाण केल्यानंतर राज्यातल्या विविध जलाशयात उतरतील.

अशी आहे सी-प्लेन सेवा
- विमानाचा प्रकार : सेस्ना 206 अ‍ॅम्फेबियन
- आसन क्षमता : चार
- एप्रिलपर्यंत : सेस्ना 208 अ‍ॅम्फिबियन जातीच्या विमानाची भर
- आसन क्षमता : नऊ जण

जल विमान सेवेचे टप्पे
- पहिला टप्पा : अ‍ॅम्बे व्हॅली जलाशय, मुळा धरण (मेहेराबाद/शिर्डी), पवना धरण (लोणावळा), वरसगाव धरण (लवासा) आणि धोम धरण (पाचगणी/महाबळेश्वर)
- दुसरा टप्पा : मुंबई ते गणपतीपुळे, हरिहरेश्वर, तारकरर्ली, मुरुड जंजिरा
- तिसरा टप्पा : मुंबई ते मराठवाडा व विदर्भ

जुहू ते नरिमन पॉइंट फक्त दहा मिनिटात
जुहू ते नरिमन पॉइंट हा प्रवास रेडिओ कॅबमधून केल्यास किमान एक तास लागतो आणि त्यासाठी 800 रुपये पडतात. परंतु सी-प्लेन सेवेसाठी 750 रुपये स्वागत शुल्क आकारण्यात येणार असून हा प्रवास अवघा दहा मिनिटांचा असेल, असे मेहरचे सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले.