आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेबी आणि भांडवल बाजारातील सुधारणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे निकष, ऑर्डर कशा द्यायच्या इत्यादी अनेक बाबींची माहिती घेतल्यानंतर या बाजारात ज्या सुधारणा झाल्या त्यावर ओझरती नजर टाकू. 1990 नंतर आर्थिक उदारीकरणाचे धोरण सुरू झाले, त्यानंतर भांडवल बाजार विकसित करणे आवश्यक होते. त्यामुळेच केंद्र सरकारने अनेक मूलभूत सुधारणा केल्या. सेबी व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) यांची स्थापना, डिमॅट म्हणजे डिमटेरिअलायझेशन, यामुळे शेअर मार्केटमधील व्यवहारात सुलभता व पारदर्शकता आली व या सगळ्यांमुळे हे मार्केट नक्कीच विकसित झाले. सेकंडरी मार्केटमधील शेअर्सच्या ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहारामुळे तर खूपच सुलभता आलेली आहे. पूर्वी खरेदीचा व्यवहार झाल्यावर विक्रेत्याकडून शेअर सर्टिफिकेट आपल्याकडे येणे, आपण ते कंपनीकडे पाठवणे, नंतर तिथे आपल्या नावाची नोंद होणे इत्यादीमुळे शेअर्स आपल्या नावावर व्हायला महिना-महिना वेळ लागायचा. शेअर्स विकल्यानंतर पैसे मिळायला वेळ लागायचा. हा वेळ आता फक्त तीन दिवसांवर आला आहे.
आता फ्युचर अँड ऑप्शन्सचे व्यवहार :
पूर्वी वायदेबाजारातील खरेदी-विक्री म्हणजे बदला पद्धत हा प्रकार होता. ती बंद झाली व त्याऐवजी आता फ्युचर अँड ऑप्शन्सचे व्यवहार होतात. ही बदला पद्धतीपेक्षा जास्त चांगली (वेल-डिफाइंड) पद्धत आहे. प्रायमरी मार्केटबाबतही सुधारणा झालेल्या आहेत. पूर्वी कंपन्यांना भांडवल बाजारात ‘आयपीओ ’ आणायचा असेल तर त्यासाठी शेअरची किंमत काय ठेवावी ते सरकारी नियंत्रक संस्था सांगत असे. ते नियत्रंण आता गेले. कंपन्यांनी योग्य मूल्यमापन करून ‘आयपीओ’साठी त्यांच्या शेअरची किंमत ठरवावी, गुंतवणूकदारांना ती योग्य वाटली तर ते हे शेअर घेतील, असे मार्केट निगडित तत्त्व आता आहे. ‘आयपीओ’करताही आता आपण ऑनलाइन अर्ज करू शकतो. तसेच अर्ज करताना आपण ‘एएसबीए ’म्हणजे ‘अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट’ या पद्धतीने करू शकतो. यामुळे जर आपल्याला शेअर्स मिळाले (अलॉट झाले) तर आणि त्यावेळीच आपल्या खात्यातून रक्कम वजा (डेबीट) होते. आयपीओ एकदा अर्ज करण्यासाठी खुला झाला की नंतर शेअर्स अलॉट होणे किंवा पैसे परत मिळणे (रिफंड) हा वेळही कमी होऊन आता तीन आठवड्यांवर आलेला आहे. सरकारतर्फे जशा या सुधारणा झाल्या तसेच बिझनेस चॅनलवर क्षणाक्षणाला मार्केटमधील घडामोडींची माहिती मिळत असते. अनेक वेबसाइटवर माहिती मिळत असते. गरज आहे ती फक्त आपण लक्ष घालून शिकण्याची. सहसा कोणी सांगितले म्हणून अभ्यास न करता शेअर्स घेतले जातात आणि त्यात नुकसान झाले तर नशिबाला बोल लावला जातो. कृपया लक्षात घ्या अभ्यास करून चांगल्या, ब्ल्यू चिप कंपन्यांचे शेअर्स घेतले तरीसुद्धा नुकसान होऊ शकते, पण निदान अज्ञान व अपुरी माहिती यामुळे नुकसान होऊ नये ही काळजी आता आपण नक्कीच घेऊ शकतो.