आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडाचा वटवृक्ष फोफावणार, सेबीने व्यक्त केली अपेक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - म्युच्युअल फंडांसाठी जाहीर करण्यात आलेले नवीन दीर्घकालीन धोरण या क्षेत्राच्या वाढीसाठी लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा ‘सेबी’ने केली आहे. सध्या म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखाली असलेली 9 लाख कोटी रुपयांची मालमत्ता पाच वर्षांत 20 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज बाजार नियंत्रकांनी व्यक्त केला आहे.
म्युच्युअल फंड उद्योगासाठीच्या पहिल्यावहिल्या दीर्घकालीन धोरणाला ‘सेबी’च्या संचालक मंडळाने गेल्या वर्षात मंजुरी दिली. या धोरणामध्ये म्युच्युअल फंड व्यवसायाच्या वाढीसाठी उपाययोजना तसेच अनेक कर लाभ देण्याचा प्रस्ताव आहे. या धोरणाच्या आराखड्यात घरगुती बचत म्युच्युअल फंडांकडे वळवण्याच्या दृष्टीने तसेच म्युच्युअल फंडांचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी असल्याचे म्हटले आहे. सेबीच्या संचालक मंडळाने सुचवलेल्या बदलानंतर या धोरणाचा अध्यादेश काढण्यात येणार आहे. लहान शहरांचे योगदान, गुंतवणूकदारांच्या खात्यांमधील वाढ, वितरकांचा विस्तार या सर्व गोष्टींमुळे म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता 20 लाख कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज बाजार नियंत्रकांनी व्यक्त केला. देशातल्या एकूण म्युच्युअल फंड कंपन्यांची गेल्या वर्षात 8 लाख कोटी रुपये असलेली व्यवस्थापनाखालील मालमत्ता वाढून आता 9 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. म्युच्युअल फंडांसाठी जाहीर केलेल्या नव्या धोरणामध्ये गुंतवणूकदारांना कर सवलती देण्याचा प्रस्ताव आहे. सरकारकडून या धोरणाला मान्यता मिळाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.
मध्यमवर्गाला आकर्षित करा
म्युच्युअल फंडातल्या किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने मध्यमवर्गीयांना लक्ष्य केले पाहिजे याकडेही बाजार नियंत्रकांनी लक्ष वेधले. कारण या क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी बाजार नियंत्रकांनी अनेक उपाययोजना करूनदेखील गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड उद्योगाची फारशी समाधानकारक वाढ झालेली नाही. अमेरिकेत घरगुती बचत म्युच्युअल फंडात गुंतवण्याचे प्रमाण 44 टक्के आहे, परंतु भारतात मात्र हेच प्रमाण 2.5 टक्के इतके आहे.