आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडक शेअर्सच्या जोरदार विक्रीची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठवड्यात जागतिक आर्थिक समस्या, सायप्रस संकट आणि देशातील राजकीय घडामोडी यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा दिसून आला. सरकारचे भवितव्य धूसर बनल्याने नव्या आर्थिक सुधारणा आणि महत्त्वाच्या विधेयकांबाबत संभ्रम निर्माण झाला. शिवाय, विदेशी गुंतवणूकदारांनीही शेअर्सच्या खरेदी-विक्रीत सावधानता बाळगली.

आगामी काळात प्रमुख व्याजदरात कपात शक्य नसल्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिल्यानंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. अशा निरुत्साहाच्या वातावरणात बाजार आता नव्या ट्रिगरच्या शोधात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांत युरोझोनमधील घडामोडींच्या वातावरणातही सकारात्मक आर्थिक अपेक्षा उंचावल्या आहेत. देशातील बाजारांच्या तुलनेत जागतिक बाजाराने चांगली कामगिरी बजावली. अमेरिकेतील बाजाराकडून सकारात्मक संकेत मिळताहेत. जगभरातील इतर शेअर बाजारांतही सकारात्मक वातावरण आहे.

चालू आर्थिक वर्ष तीन दिवसांनी संपणार आहे. अशा स्थितीत चालू आठवडा शेअर बाजारासाठी काही खास आहे असे वाटत नाही. बाजाराला बुधवारी होळीची सुटी, गुरुवारी डेरिव्हेटिव्ह सौदापूर्ती आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुटी असे चित्र आहे. एकूणच बाजारात सतर्कतेचे वातावरण राहील. मात्र, गुरुवारी अस्थैर्य दिसून येईल. सोमवारी नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात सकारात्मक पातळीने होईल अशी अपेक्षा आहे. निवडक शेअर्सची जोरदार खरेदी होण्याची शक्यता आहे. दोन सत्रांपर्यंत घसरणीचा कल दिसू शकतो. त्यानंतर मात्र तेजी येण्याची चिन्हे आहेत.

घसरणा-या निफ्टीला सर्वप्रथम 5612 पातळीवर आधार मिळण्याची शक्यता आहे. मात्र ही पातळी
फारशी मजबूत वाटत नाही. मोठ्या व्हॉल्यूमसह या स्तरावर विक्री होऊन ही पातळी तुटली तर पुढील आधार 5591 वर मिळेल. याही पातळीवरून निफ्टीची घसरण झाल्यास पुढील आधार 5538 वर मिळेल. सद्य:स्थितीत बाजारासाठी ही बॉटम पातळी असण्याची शक्यता आहे.

वरच्या दिशेचा विचार केल्यास निफ्टीला पहिला अडथळा 5658 वर होईल. हा फारसा तगडा नव्हे, परंतु महत्त्वाचा अडथळा आहे. निफ्टी जर या पातळीच्या वर बंद झाला तर हा पहिला सकारात्मक संकेत असेल. निफ्टीला दुसरा महत्त्वाचा अडथळा 5700 या पातळीवर होईल. या पातळीवर बंद होणे हे निफ्टीतील तेजी आल्याचे लक्षण मानावे. या स्तरावर शॉर्ट रॅलीची शक्यता आहे. त्यानंतर निफ्टीला पुढील अडथळा 5803 या पातळीवर होण्याची शक्यता आहे.
शेअर्सच्या बाबतीत सांगायचे झाले, तर या आठवड्यात एसीसी लिमिटेड, विप्रो लिमिटेड आणि बायोकॉन लिमिटेड चार्टवर उत्तम वाटताहेत. एसीसीचा मागील बंद भाव 1158.85 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 1181 रुपये आणि स्टॉप लॉस 1132 रुपये आहे.

विप्रोचा मागील बंद भाव 437.95 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 444 रुपये आणि स्टॉप लॉस 426 रुपये आहे. तर बायोकॉनचा मागील बंद भाव 270.85 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 277 रुपये आणि स्टॉप लॉस 262 रुपये आहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
Vipul.verma@dainikbhaskargroup.com