आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Again Made Record, Go On 21,373.67 Points

सेन्सेक्सचा पुन्हा विक्रम,87 अंकांच्या वाढीसह 21,373.67 पातळीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मरगळलेल्या बाजारात काही निवडक समभागांची चांगली खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्सने 36 अंकांच्या वाढीची नोंद करीत 21,373.66 अंकांच्या नव्या कमाल पातळीची नोंद केली. बुधवारी सेन्सेक्समध्ये 87 अंकांची वाढ होऊन तो 21,337.67 अंकांच्या कमाल पातळीवर गेला होता. त्यानंतर सलग दुस-या दिवशीही सेन्सेक्स कमाल पातळीवर बंद झाला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आशियाई शेअर बाजारातील नरमाईमुळे सकाळच्या सत्रात 21,264.71 अंकांच्या खालच्या पातळीवर उघडला होता, पण नंतरच्या सत्रात सेन्सेक्समध्ये सुधारणा होऊन मधल्या सत्रानंतर तर त्याने 21,400 अंकांची पातळी ओलांडली होती. मधल्या सत्रातील 21,265.71 अंकांची कमाल पातळी गाठण्यासाठी सेन्सेक्सला 70 अंक कमी पडला.
या अगोदर मागील वर्षात 9 डिसेंबरला सेन्सेक्सने 21,483.74 अंकांची कमाल पातळी गाठली होती. दिवसअखेर सेन्सेक्स 35.99 अंकांनी वाढून 21,373,66 अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकानेही दिवसभरात 6363.90 अंकांची विक्रमी पातळी गाठली. निफ्टी 6.70 अंकांची वाढ नोंदवून 6345.65 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
चढता आलेख कायम ठेवत सेन्सेक्स नव्या नव्या कमाल बंद पातळींची नोंद करीत आहे, परंतु किरकोळ गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर नफारूपी विक्री सुरू ठेवल्याने दुस-या श्रेणीतील समभाग मात्र मार खात आहेत. त्यामुळे मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभाग अनुक्रमे 0.48 टक्के आणि 0.12 टक्क्यानी घसरून बंद झाले.
चीनमधील उत्पादनाचा वेग जानेवारीमध्ये अनपेक्षित कमी झाल्याचा परिणाम आशियाई शेअर बाजारावर झाला. परिणामी चीन, हॉँगकॉँग, जपान, दक्षिण कोरिया, तैवान शेअर बाजार गडगडले, परंतु युरोप शेअर बाजारात मात्र संमिश्र वातावरण होते.
नव्या कमाल पातळीचे मानकरी
एल अँड टी, एचडीएफसी, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, आयटीसी, भारती एअरटेल, गेल इंडिया हे सेन्सेक्सला नव्या विक्रमी पातळीवर घेऊन जाणारे मानकरी ठरले.
लार्सन अँड टुब्रोने भाव खाल्ला
बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील लार्सन अँड टुब्रोच्या निव्वळ नफ्यामध्ये डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 22.44 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात कंपनीच्या समभागाने भाव खात 2.81 टक्क्यांची सगळ्यात जास्त कमाई केली.
टॉप गेनर्स
अ‍ॅक्सिस बँक, गेल इंडिया, सन फार्मा, एचडीएफसी, भारती एअरटेल, भेल.
टॉप लुझर्स
महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, एनटीपीसी, कोल इंडिया, टीसीएस, टाटा स्टील.
घडामोडींचा अभाव
बाजाराला चालना देणा-या घडामोडी घडत नसल्याने सेन्सेक्स सध्या एका ठरावीक श्रेणीत फिरत आहे. रिझर्व्ह बॅँकेचे पतधोरण 28 जानेवारीला जाहीर होत असल्याने शुक्रवारी आणखी एकदा मरगळीचे वातावरण दिसेल. जिग्नेश चौधरी, संशोधन प्रमुख, व्हॅरासिटी ब्रोकिंग