आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीची आतषबाजी : संवत्सराची अखेर उच्चांकाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुहूर्ताचे सौदे तेजीत होण्याचे संकेत देतानाच संवत्सर 2069 च्या अखेरीस बाजारात झालेल्या तुफान खरेदीत सेन्सेक्सने 32 अंकांची वाढ नोंदवली. पण त्या वेळी अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याच्या पुन्हा नव्याने जागलेल्या अपेक्षा आणि भांडवल बाजारात विदेशी संस्थांकडून सातत्याने येत असलेल्या निधीच्या ओघामुळे सेन्सेक्सचे रॉकेट 21,196.81 अंकांच्या पातळीवर जाऊन पोहोचले. त्यामुळे मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये रविवारी समभाग खरेदीचे फटाके जोरदार वाजणार यात शंका नाही.

संवत्सराच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्सने कामकाजाच्या मधल्या सत्रातच 21,293.88 अंकांची कमाल पातळी गाठली. त्याअगोदर सेन्सेक्सने 10 जानेवारी 2008 रोजी 21,206.77 अंकांची कमाल पातळी गाठली होती. दिवसअखेर सेन्सेक्सने 32.29 अंकांची कमाई करीत 21,196.81 अंकांच्या कमाल बंद पातळीची नोंद केली. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्समध्ये 626.53 अंकांची वाढ झाली आहे. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकातही 8.05 अंकांची वाढ होऊन तो 6307.20 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
दीपावलीच्या मुहूर्तावर बाजारात झालेल्या खरेदीत बॅँका आणि वाहन समभागांनी भाव खाल्ला. त्यातही टाटा मोटर्स, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा, स्टेट बॅँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बॅँक यांच्या समभागांना जास्त मागणी आली. स्थावर मालमत्ता आणि धातू समभागांनीदेखील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.
आर्थिक यंत्रणेतील खेळत्या भांडवलाची स्थिती सुधारणे तसेच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने मंगळवारी अल्प मुदतीच्या व्याजदरात पाव टक्क्याने वाढ केल्यापासून बाजारात सलग चौथ्या दिवशी चांगली वाढ झाली आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने तेथील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आपला रोखे खरेदी कार्यक्रम यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय याच आठवड्यात घेतल्यामुळे बाजाराला फार मोठा दिलासा मिळाला. हाच उत्साह त्यांच्या आक्रमक खरेदीतून दिसून आला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनीदेखील याच आनंदात सलग 20 व्या दिवशी जवळपास 1,875.87 कोटी रुपयांची समभाग खरेदी केली आहे. कंपन्यांनी तिमाहीत चांगला नफा कमावल्यामुळेही बाजारात भांडवलाचा ओघ वाढला आहे. परंतु बाजारातील सध्याच्या तेजीचा फायदा घेऊन काही गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्री केली. ऑक्टोबर महिन्यात वाहनांची विक्री चांगली झाल्याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम होऊन या खरेदीला आणखी बळ मिळाल्याचे मत भांडवल बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

अर्थमंत्री आशावादी
संवत्सराच्या सरत्या दिवशीच अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी चालू खात्यातील तूट नियंत्रणाखाली असून वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठता येण्याबद्दल ठाम विश्वास व्यक्त केल्यामुळेही बाजारात ख-या अर्थाने खरेदीचा उत्साह वाढला. इतकेच नाही, तर चांगला पाऊस पडल्यामुळे यंदा चांगले पीक येऊन निर्यातवाढीचे चक्रही गतिमान राहण्याचा आशावाद व्यक्त केला आहे. भांडवल बाजारात आनंद असल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला, परंतु अति आनंदाबद्दलही गुंतवणूकदारांना सावध केले.