आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - जिंदाल स्टीलमुळे कोळसा वाटप प्रकरणाला मिळालेले नवीन वळण, रुपयाच्या सलग घसरणीमुळे व्याजदर कपातीच्या मावळू लागलेल्या अपेक्षा याचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. अखेरच्या सत्रात झालेल्या तुफान विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 298 अंकांनी घसरून जवळपास दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
रुपयाच्या मूल्यात पुन्हा सुधारणा होऊन ती 58.4 च्या पातळीवर आली. परंतु कामकाजाच्या अखेरच्या सत्रात पुन्हा विक्रीचा जोर वाढून सेन्सेक्स 298.07 टक्क्यांनी घसरून 19,143 अंकांच्या पातळीवर बंद झाला. 18 एप्रिलच्या 19,016.46 अंकांच्या बंद पातळीनंतरची ही सर्वात नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 89.20 अंकांनी घसरून 5788.80 अंकांच्या पातळीवर बंद झाला. बाजारातील तुफान विक्रीच्या मा-यात सर्व 13 क्षेत्रीय निर्देशांक गडगडले. परिणामी गुंतवणूकदारांची श्रीमंती जवळपास एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाली.
कोळसा वाटप घोटाळा प्रकरणी ‘सीबीआय’ने नव्याने सादर केलेल्या ‘एफआयआर’मध्ये नवीन जिंदाल आणि कंपनीचे नाव घेतले आहे. परिणामी सकाळच्या सत्रात जिंदाल स्टीलचे समभाग आदळले. सकाळी कंपनीच्या समभागाची किंमत 24 टक्क्यांनी गडगडली होती. परंतु दिवसअखेर हा समभाग 15.18 टक्क्यांनी घसरून 226.25 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. दरम्यान, मधल्या सत्रात डॉलरसमोर साष्टांग नमस्कार घालत रुपयाने नीचांकी पातळी गाठल्याने बाजाराचा मूड जाऊन तुफान विक्रीचा मारा सुरू झाला. परिणामी निर्देशांक दुपारच्या सत्रात 320 अंकांनी गडगडला, तर निफ्टी 5800 अंकांच्या पातळीखाली गेला. या विक्रीचा फटका प्रामुख्याने धातू, स्थावर मालमत्ता आणि बँक समभागांना बसला.
व्याजदर कपातीवर टांगती तलवार
रुपयाचे सातत्याने सुरू असलेले अवमूल्यन लक्षात घेता रोख्यांवरील मिळकत आणखी खालच्या पातळीला जाणे रिझर्व्ह बँकेला स्वीकारार्ह ठरणारे नाही. त्यामुळे महागाई कमी होऊनही रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता फार कमी असल्याचे मत एचडीएफसी सिक्युरिटीजने व्यक्त केले आहे. ‘आयआयएफएल’ या आणखी एका ब्रोकिंग कंपनीने चालू खात्यातील वाढती तूट, महागाई आणि आर्थिक साहाय्य कार्यक्रम लवकरच आवरता घेण्याची शक्यता, रिझर्व्ह बँकेला व्याजदर कपात करण्यापासून रोखण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
बाजारात करेक्शनची शक्यता
रुपयाचे अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाल्याने भांडवल बाजारातून काही प्रमाणात निधी बाहेर जाण्याची तसेच शेअर बाजारात करेक्शन येण्याची शक्यता एन्जेल ब्रोकिंगचे व्यवस्थापकीय संचालक ललित ठक्कर यांनी व्यक्त केली.
टॉप लुझर्स
हिंदाल्को, टाटा पॉवर, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, कोल इंडिया, स्टरलाइट इंडस्ट्रीज, एचडीएफसी, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, टीसीएस, एचडीएफसी बॅँक, सन फार्मा, भेल, टाटा मोटर्स
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.