आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयच्या संकेताने सेन्सेक्सची 169 अंकांनी घसरगुंडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महागाई अद्यापही चढ्याच पातळीवर असल्याचे सांगून रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी व्याजदर कमी होण्याची शक्यता नसल्याचेच अप्रत्यक्ष संकेत दिल्यामुळे बाजाराच्या सर्व अंशांना सुरुंग लागला. नाराज झालेल्या गुंतवणूकदारांनी वाहन, बँका आणि स्थावर मालमत्ता समभागांची जोरदार विक्री करून व्यक्त केलेल्या रागात सेन्सेक्स 169 अकांनी घसरून 19,817.63 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्स पहिल्यांदाच खाली आला. गेल्या तीन सत्रांमध्ये 324 अंकांची उसळी घेतल्यानंतर सेन्सेक्सने तब्बल दोन वर्षांनंतर 20 हजारांचे शिखरही सर केले होते. मात्र, बुधवारी या कमाईवर पाणी पडले.

कंपन्यांचे चांगले आर्थिक निकाल, ‘गार’ची दोन वर्षे लांबणीवर पडलेली अंमलबजावणी आणि व्याजदर कपातीची उंचावलेली आशा यामुळे बाजारात गेल्या काही दिवसांपासून तेजीचे वातावरण निर्माण झाले होते. पण सुब्बाराव यांच्या वक्तव्यानंतर मात्र बाजाराच्या अपेक्षा पूर्णपणे मावळल्या. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 54.75 अंकांनी घसरून 6,0001.85 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

जेव्हा आर्थिक वृद्धी मंदावते त्या वेळी सुलभ नाणेनिधी धोरण किंवा आर्थिक डोस देऊन तिला बळकटी देता येते. परंतु महागाई अद्यापही चढ्या पातळीवरच असल्याने या दोन्ही गोष्टींसाठी सध्या संधी नाही, असे सुब्बाराव यांनी लखनऊ येथे मंगळवारी सांगितले.रिझर्व्ह बॅँकेचा पतधोरण आढावा 29 जानेवारीला जाहीर होणार असल्याने तमाम बाजाराचे त्याकडे लक्ष लागले आहे.

सुब्बाराव यांच्या निराशाजनक वक्तव्यानंतर बाजारात तुफान विक्रीचा मारा होऊन आयसीआयसीआय बँक, स्टेट बॅँक, टाटा मोटर्स, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा, मारुती सुझुकी यांच्या समभागांना जोरदार फटका बसला. तुफान विक्रीच्या मा-या त 13 क्षेत्रीय निर्देशांकापैकी 12 क्षेत्रीय निर्देशांक गडगडले. त्याच्याच जोडीला डीएलएफ, शोभा डेव्हलपर्स, युनिटेक, अनंत राज या स्थावर मालमत्ता समभागांनादेखील तोटा सहन करावा लागला.
युरोप शेअर बाजारात आलेल्या नरमाईमुळे आशिया शेअर बाजारातदेखील तशीच स्थिती निर्माण झाली. त्याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.

टॉप लुझर्स
हिंदाल्को, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, जिंदाल स्टील, महिंद्रा, एसबीआय, टाटा स्टील, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, भेल, टाटा पॉवर, सन फार्मा, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, एल अँड टी.