आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडतर आठवड्यात बाजाराची गाळण, सेन्सेक्स २५१ अंकांनी घसरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पिंपामागे ६० डॉलरच्या खाली आल्याचा फटका शेअर बाजारातील तेल कंपन्यांना बसला. गुंतवणूकदारांनी तेल कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री केल्याने शुक्रवारी बाजाराची घसरणीने गाळण उडाली. तेल आणि वायू, रिअ‍ॅल्टी व धातू कंपन्यांच्या समभागांच्या जोरदार विक्रीने सेन्सेक्स २५१.३३ अंकांनी
घसरून २७,३५०.६८ वर स्थिरावला. निफ्टी ६८.८० अंकांच्या घसरणीसह ८,२२४.१० वर आला. किरकोळ महागाई आणि औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पिंपामागे ६० डॉलरच्या खाली आल्या. जून २००९ नंतरची ही नीचांकी पातळी आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तेल कंपन्यांचा नफा घटणार आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि गेल इंडियासारख्या दिग्गज समभागांची जोरदार विक्री झाली. मुंबई शेअर बाजारातील १२ पैकी ११ क्षेत्रीय निर्देशांकांत घसरण दिसून आली. आशियातील हाँगकाँग वगळता इतर प्रमुख बाजारांत वाढीचा कल दिसला, तर युरोपातील प्रमुख बाजारांत प्रारंभीच्या सत्रात घसरण होती.
खडतर आठवडा
शेअर बाजाराच्या दृष्टीने सरता आठवडा अत्यंत खडतर राहिला. साप्ताहिक आधारावर सेन्सेक्स १,१०७.४२ अंकांनी घसरला आहे. डिसेंबर २०११ नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.

घसरलेले समभाग
गेल इंडिया, टाटा स्टील, ओएनजीसी, सेसा स्टरलाइट, भेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, एल अँड टी, डॉ. रेड्डीज लॅब, बजाज ऑटो, अ‍ॅक्सिस बँक, टीसीएस, हिंदाल्को, विप्रो, एसबीआय, टाटा मोटर्स
वधारलेले समभाग
मारुती सुझुकी, भारती एअरटेल, इन्फोसिस, सन फार्मा
कच्च्या तेलाचा पुन्हा नीचांक
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पिंपामागे ६० डॉलरच्या खाली आल्या. जुलै २००९ नंतरची ही तेलाची नीचांकी पातळी आहे.

सोने -चांदी वधारले
लग्नसराईमुळे स्थानीक व्यापा-यांकडून मागणीत वाढ झाल्याने मौल्यवान धातूंच्या किमती शुक्रवारी वधारल्या. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे १० रुपयांनी वाढून २७,३१० झाले. औद्योगिक क्षेत्रातून चांदीला चांगली मागणी आल्याने चांदी किलोमागे ३६० रुपयांनी चकाकून ३८,५६० झाली. सराफा व्यापा-यांनी सांगितले, देशात सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुले रिटेलर्स आणि ज्वेलर्सकडून सोन्याला चांगली मागणी आली. जागतिक सराफा
बाजारात सोने घसरले असतानाही देशातील मागणीमुळे सोने वधारले. सिंगापूर सराफ्यात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ०.८ टक्क्यांनी घसरून १२१७.५० डॉलर झाले. मात्र, देशातील मागणीमुळे सोन्याच्या किमती स्थिरावण्यास मदत झाली.

एफआयआयची विक्री
शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) केलेल्या विक्रीमुळेही घसरणीला हातभार लागला.एफआयआयने ८०८.२७ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.