आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफारूपी विक्रीच्या मा-यात सेन्सेक्सची घसरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आशियाई शेअर बाजारातील तेजीवर स्वार होत सकाळच्या सत्रात केलेल्या कमाईचा फारसा फायदा होऊ शकला नाही. कोल इंडिया, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक आणि एल अँड टी या बड्या समभागांच्या
नफारूपी विक्रीच्या मा-यात सेन्सेक्सने सलग पाचव्या सत्रातही घसरणीचा सूर कायम ठेवला.

वॉलस्ट्रीट बाजारात आलेल्या तेजीचे वारे आशियाई शेअर बाजारांपर्यंत पोहोचल्यामुळे सकाळच्या सत्रात बाजारात चांगली खरेदी झाली. परिणामी सेन्सेक्स 107 अंकांची वाढ नोंदवत 19,767.25 अंकांच्या पातळीवर जाऊन पोहोचला होता. परंतु, मधल्या सत्रात बाजाराचा नूर पलटला आणि नफारूपी विक्रीचा मारा होऊन सेन्सेक्स 20.10 अंकांनी घसरून 19,639.72 अकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या पाच सलग सत्रांत सेन्सेक्स 360 अंकांनी घसरला आहे. राष्‍ट्री य शेअर बाजारातही सकाळी सकारात्मक वातावरण होते; परंतु नंतर निफ्टीही किरकोळ 2.30 अंकांनी घसरून 5959.20 अंकांच्या पातळीवर बंद झाला. जागतिक शेअर बाजारातील भक्कम स्थितीमुळे बाजारात दिवसभरात चढ - उताराचे वातावरण होते; परंतु बाजारात झालेल्या काही निवडक समभागांच्या खरेदीमुळे मोठ्या घसरणीला अटकाव झाला.बहुतांश कंपन्यांचे तिस-या तिमाहीतील आर्थिक निकाल जाहीर झाल्यामुळे आता बाजाराला जवळ येत असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे वेध लागले असल्याचे मत बाजारातील दलालांनी व्यक्त केले.

भांडवल बाजारातील उलाढाल कमी होऊन ती सोमवारच्या 2,452.60 कोटी रुपयांवरून मंगळवारी 2,097.69 कोटी रुपयांवर आली. शेअर बाजारात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी भांडवल बाजारात 489. 27 कोटी रुपयांची समभाग खरेदी केली.

जागतिक शेअर बाजारात दक्षिण कोरियातील मरगळ वगळता अन्य आशियाई बाजारांनी चांगली कमाई केली. त्यातही येन चलनाने मोठा नीचांक गाठल्यामुळे जपान शेअर बाजाराने गेल्या चार वर्षांच्या उच्चांकाची नोंद केली. युरोप शेअर बाजारात दुपारच्या सत्रात संमिश्र वातावरण होते.

टॉप लुझर्स : एनटीपीसी, कोल इंडिया, भेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी.
टॉप गेनर्स : जिंदाल स्टील, मारुती सुझुकी, एचडीएफसी, टीसीएस, हिंदाल्को इंडस्ट्रीज, आयटीसी, टाटा स्टील.