Home | Business | Share Market | sensex down

सेन्सेक्सची घसरगुंडी

वृत्तसंस्था | Update - Jun 04, 2011, 05:43 AM IST

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 37 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कृष्णा-गोदावरी खोर्‍यातील नैसर्गिक वायू उत्पादनातील घसरण रोखण्याच्या दृष्टीने अपेक्षित कोणतीही योजना मुकेश अंबानींनी जाहीर न केल्याने बाजाराचा हिरमोड झाला.

  • sensex down

    मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 37 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कृष्णा-गोदावरी खोर्‍यातील नैसर्गिक वायू उत्पादनातील घसरण रोखण्याच्या दृष्टीने अपेक्षित कोणतीही योजना मुकेश अंबानींनी जाहीर न केल्याने बाजाराचा हिरमोड झाला. या नाराजीतून झालेल्या विक्रीच्या मार्‍यामुळे सेन्सेक्स 117 अंकांनी घसरला. विशेष म्हणजे अनिल अंबानी यांच्या समूहातील समभागांना मागणी येऊनही त्याचा फारसा परिणाम बाजारावर झाला नाही. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 18,672.65 अंकांच्या कमाल पातळीवर उघडला होता, परंतु नैसर्गिक वायूच्या घसरणीला रोखण्याबाबत अपेक्षित अशा कोणत्याही उपाययोजना अंबानी यांनी जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे दुपारच्या सत्रापर्यंत चांगली कमाई करणार्‍या रिलायन्सच्या समभागांची नंतर सुरू झालेल्या विक्रीच्या मार्‍यात घसरण सुरू झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभाग किमतीमध्ये 1.65 टक्क्यांनी घसरण होऊन ती 936.15 रुपयांवर आली. त्यामुळे अगोदरच्या सत्रात 114.63 अंकांची घसरण झालेल्या सेन्सेक्समध्ये आणखी 117.70 अंकांनी घसरण होऊन तो 18,376.48 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकातही 33.25 अंकांची घसरण होऊन तो 5,516.75 अंकांच्या पातळीवर बंद झाला. अमेरिकेतील आर्थिक सुधारणांची मंदावलेली गती तसेच बेरोजगारीच्या जाहीर झालेल्या आकडेवारीमुळे आशियाई शेअर बाजारात नरमाईचे वातावरण होते. त्याचाही परिणाम बाजारावर झाला. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी दाखल जनहित याचिकेमध्ये अनिल अंबानी व रतन टाटा यांची चौकशी करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे अनिल अंबानी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स कॅपिटल या सर्व समभागांची चांगली खरेदी झाली. त्याच्याच जोडीला विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवल बाजारात केलेल्या 6.9 अब्ज डॉलरच्या समभाग खरेदीमुळेही सेन्सेक्सच्या घसरणीला काही प्रमाणात लगाम बसला.

Trending