आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- रिझर्व्ह बॅँकेच्या पतधोरणाची तारीख जशी जवळ येत आहे. तसे गुंतवणूकदारांनी विक्री करणे पसंत केले आहे. त्यामुळे पतधोरणाच्या अगोदरच या गुंतवणूकदारांनी स्थावर मालमत्ता, धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांच्या केलेल्या नफारूपी विक्रीत सेन्सेक्स 103 अंकांनी घसरून 20 हजारांच्या पातळीखाली गेला.
वास्तविक पाहता सकाळच्या सत्रात चांगली सुरुवात करताना सेन्सेक्सने 20,072.28 अंकांची पातळी गाठली होती; परंतु टाटा मोटर्सने आपल्या जॅग्वार लॅँड रोव्हर विभागाच्या नफ्याबाबत दिलेल्या इशा-या मुळे बाजाराचा मूड गेला.
टाटा मोटर्सबरोबरच गेल आणि सिप्लाच्या समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री होऊन सेन्सेक्स दिवसअखेर 102.83 अंकांनी घसरला. सेन्सेक्स 19,923.78 अंकांच्या एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 34.95 अंकांनी घसरून 6019.35 अंकांच्या एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
रिझर्व्ह बॅँकेचा पतधोरण आढावा 29 जानेवारीला जाहीर होणार असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळेच त्याअगोदर गुंतवणूकदारांनी आयसीआयसीआय बॅँक, एचडीएफसी बॅँक, स्टेट बॅँक या व्याजदर संवेदनशील समभागांबरोबरच स्थावर मालमत्ता समभागांची विक्री करून नफा कमावण्याचा प्रयत्न केला.
लार्सन अॅँड टुब्रोने तिस-या तिमाहीत केलेल्या चमकदार आर्थिक कामगिरीमुळे या समभागाने चांगली कमाई केली. त्याचप्रमाणे आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, ओएनजीसी यांच्या समभाग खरेदीमुळे घसरणीला काही प्रमाणात वेसण बसली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.