आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्या कंपन्यांकडून अपेक्षाभंग, महिन्याच्या तेजीला फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपयाच्या घसरणीला आवर घालण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने केलेल्या कडक उपाययोजना आणि दुसर्‍या बाजूला एल अ‍ॅँड टीसह काही बड्या कंपन्यांनी पहिल्या तिमाहीत केलेल्या खराब कामगिरीमुळे बाजाराचा हिरमोड झाला. परिणामी बाजारात झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स साप्ताहिक आधारावर 402 अंकांनी घसरून 19,748.19 अंकांच्या दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

मंगळवारी 30 महिन्यांची उच्चांकी पातळी गाठलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सौदापूर्ती सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी 401.66 अंकांनी घसरून 19,748.19 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्सने तब्बल 1,375.61 अंकांची कमाई केली होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 143 अंकांनी घसरून 5886.20 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

अभियांत्रिकी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एल अ‍ॅँड टीने पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा केलेल्या खराब कामगिरीमुळे बाजारात नरमाईचे वातावरण होते, परंतु सोन्याच्या आयातीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने केलेल्या नव्या उपाययोजना बाजारासाठी अनुकूल ठरल्या. त्यातच अमेरिकेतील घरांची विक्री घटल्यामुळे फेडरल रिझर्व्ह बँक आपला आर्थिक साहाय्यता कार्यक्रम कायम ठेवण्याचे संकेत मिळाले आहेत. या दोन्ही गोष्टींमुळे मंगळवारी बाजारात सुधारणा झाली.

चालू खात्यातील तूट नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने सोमवारी सोने आयातीला पायबंद घालण्यासाठी नव्याने केलेल्या उपाययोजना बाजारातील उत्साह वाढवण्यास कारणीभूत ठरल्याचे मत शेअर बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केले. परंतु चलन विनिमय दरातील चढ-उताराला लगाम घालून रुपयाला बळकटी देण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने अन्य व्यावसायिक बॅँकांनी मध्यवर्ती बॅँकेकडे ठेवावयाच्या रोख राखीव प्रमाणात थेट 70 टक्क्यांवरून 99 टक्क्यांपर्यंत वाढ केली. बॅँकांना चालू बचत खाते, मुदतठेवींमार्फत जमा केलेल्या एकूण रकमेच्या 4 टक्के रक्कम रिझर्व्ह बॅँकेकडे ठेवणे बंधनकारक असते . बॅँका सप्ताहाअखेरच्या दिवशी एकूण रकमेच्या सरासरी 70 टक्के रिझर्व्ह बॅँकेकडे ठेवतात. परंतु ही मुभा काढून घेतल्याने आता बॅँकांना दररोज 99 टक्के रक्कम राखण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे चलनातून 16 हजार कोटी रुपये कमी होणार आहेत.

रिझर्व्ह बँकेचा धडाका
रिझर्व्ह बॅँकेच्या या कडक उपाययोजनांमुळे रुपयाला काही प्रमाणात बळकटी मिळालेली असली तरी दुसर्‍या बाजूला त्याचा नकारात्मक परिणाम बाजारावर झाला. विक्रीच्या मार्‍यात एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅँक, एचडीएफसी आणि स्टेट बॅँकेला बसला. केवळ बॅँकांच्या समभागांमुळे बुधवारी सेन्सेक्स 164 अंकांनी घसरला. रिझर्व्ह बॅँकेच्या या कडक उपाययोजनांचा घाऊक कर्जाचे प्रमाण जास्त असलेल्या बॅँकाना मोठा फटका बसणार आहे. विशेषकरून व्याजदर संवेदनशील समभागांवर ताण येण्याची शक्यता कोटक सिक्युरिटजचे उपाध्यक्ष संजीव झरबडे यांनी व्यक्त केली.