आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स गडगडला, रुपया सावरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फेडरल रिझर्व्हच्या रोखे खरेदी कार्यक्रमात झालेल्या कपातीचा भांडवली ओघावर होणारा परिणाम, भारताबरोबरच आता चीनची मंदावलेली आर्थिक वाढ या दोन चिंतांनी बाजाराला त्रस्त केले. जागतिक बाजारातील नरमाईच्या पार्श्वभूमीवर झालेल्या तुफान विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 305 अंकांनी गडगडत 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य मात्र 12 पैशांनी वधारून 62.56 झाले.
सकाळच्या सत्रातच सेन्सेक्स खालच्या पातळीवर उघडला आणि त्यानंतर दिवसभर तो नकारात्मक पातळीवरच होता. दिवसअखेर सेन्सेक्स 304.59 अंकांनी घसरून 20,209.26 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याअगोदर 13 नोव्हेंबरला सेन्सेक्स 20,194.40 अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. गेल्या सात दिवसांत सेन्सेक्स सहाव्यांदा घसरला आहे. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 87.70 अंकांनी घसरून 6001.80 अंकांच्या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
एचडीएफसी, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि टाटा मोटर्स या बड्या कंपन्यांना विक्रीचा फटका बसला. जागतिक बाजारातील नरमाईमुळे बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. त्यातच चीनमधील आर्थिक वाढीच्या निरुत्साहजनक आकडेवारीमुळे धातू समभागांवरील विक्रीचा ताण आणखी वाढल्याचे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक निधी सारस्वत यांनी व्यक्त केले. वास्तविक पाहता देशातील उत्पादन क्षेत्राने गेल्या दहा महिन्यांतील सर्वाधिक चांगली कामगिरी करताना जानेवारीत चांगल्या उत्पादन वाढीची नोंद केली. परंतु त्याचा बाजारावर कोणताही परिणाम होऊ शकला नाही. उलट फेडरल रिझर्व्हने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आपल्या नियोजित मासिक रोखे खरेदी कार्यक्रमात प्रतिमहिना 10 अब्ज डॉलरने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भांडवल बाजारात येणारा निधीचा ओघ आटण्याची भीती बाजाराला वाटत असल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात केलेल्या व्याजदरवाढीनंतर स्थावर मालमत्ता, वाहन आणि बँक समभागांना फटका बसणे कायम आहे. दुस-या बाजूला तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा आणि रिफायनरी समभागांवरदेखील विक्रीचा ताण आला आहे.
व्हेरासिटी ब्रोकिंग सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख जिग्नेश चौधरी यांच्या म्हणण्यानुसार शेअर बाजाराने मागील आठवड्यातील मरगळीचा कित्ता नव्या आठवड्यातही गिरवला आहे.
टॉप गेनर्स : हिंदाल्को, टाटा मोटर्स, टाटा स्टील, बजाज ऑटो, भेल, भारती एअरटेल, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, स्टेट बँक, इन्फोसिस, टीसीएस, टाटा पॉवर, सेसा, स्टरलाइट, विप्रो, आयटीसी.
टॉप लुझर्स : गेल इंडिया, डॉ. रेड्डी लॅब, सन फार्मा
सोने-चांदी चकाकले
आशियातील सराफा बाजारातील सकारात्मक कल आणि सातत्यपूर्ण मागणी यामुळे दोन्ही मौल्यवान धातू सोमवारी चकाकले. दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे 50 रुपयांनी वाढून 30,400 झाले. चांदी किलोमागे 10 रुपयांनी चकाकून 43,610 झाली. सराफा व्यापा-यांनी सांगितले, लग्नसराईमुळे सोन्या-चांदीला असलेली मागणी, शेअर बाजारातील घसरण आणि आशियाच्या सराफ्यातील सकारात्मक कल यामुळे सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे 0.2 टक्क्यांनी वाढून 1247.21 डॉलरवर पोहोचले. स्थानिक बाजारात गेल्या दोन दिवसांत सोने तोळ्यामागे 70 रुपयांनी महागले आहे.
रुपयाला पुन्हा तरतरी
तीन दिवसांतील घसरणीचा कल मोडून काढत सोमवारी रुपयाला तरतरी आली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 12 पैशांनी वाढून 62.56 झाले. मागील दोन सत्रांत रुपयाचे 27 पैशांनी अवमूल्यन झाले होते.
जगभर पडझड
चीनच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावल्यामुळे जागतिक आर्थिक सुधारणांबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. याचा परिणाम म्हणजे जागतिक पातळीवर आशियाई शेअर बाजार, विशेषकरून जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर शेअर बाजारात घसरण झाली. बड्या कंपन्यांनी आर्थिक कामगिरीत केलेली निराशा आणि उगवत्या अर्थव्यवस्थेतील नरमाईमुळे अमेरिकेतील शेअर बाजारदेखील गडगडला