मुंबई - गुंतवणूकदारांनी नफा वसुलीवर भर दिल्याने गेल्या चार दिवसांत सेन्सेक्स ८०० अंकांनी खाली आला आहे. बुधवारीही शेअर बाजारात विक्रीचा कल दिसून आला. भांडवली वस्तू आणि बँकांच्या समभागांची जोरदार विक्री झाल्याने सेन्सेक्स ११७.०३ अंकांनी घसरून २८,८८३.११ वर आला, तर निफ्टी ३२.८५ अंकांच्या घटीसह ८७२३.७० वर स्थिरावला.
बुधवारी शेअर बाजारात चढ-उताराचा खेळ चांगलाच रंगला. सकाळच्या सत्रात सकारात्मक सुरुवात केलेल्या सेन्सेक्सने दुपारच्या सत्रांत गटांगळी खाल्ली. धातू, रिअॅल्टी आणि आरोग्य या क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली, तर भांडवली वस्तू, बँकिंग, टिकाऊ वस्तू आणि वाहन निर्देशांकांना विक्रीचा फटका बसला.
डिसेंबर तिमाहीत बँकांची कामगिरी खराब राहिल्याचा फटका या समभागंना बसत आहे. चीनमधील अस्थिर आकडेवारीमुळे धातू कंपन्यांचे समभागही विक्रीचा बळी ठरत आहेत. आशियातील हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान या शेअर बाजारात तेजी, तर चीनच्या शांघाय काम्पोझिट ०.९६ टक्के घसरण झाली. युरोपातील प्रमुख बाजारात घसरण दिसून आली.
खराब कामगिरीचा बँकांना फटका
ऑक्टोबर - डिसेंबर २०१४ या तिमाहीत देशातील प्रमुख बँकांची कामगिरी खराब असल्याचे आर्थिक निकालावरून स्पष्ट झाले. बँकांचा वाढता अनुत्पादक खर्च (एनपीए) गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे बँक समभागाच्या विक्रीतून नफा पदरात पाडून घेण्यावर गुंतवणूकदारांचा कल आहे. त्याचा फटका बँकांच्या समभागांना बसला.
विक्रीचा कल
बाजारात बुधवारी संमिश्र कल होता, मात्र शेवटच्या तासात बँकिंग, ऑटो, मेटल कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने बाजार घसरला. सध्या गुंतवणूकदारांचा कल विक्रीकडे आहे. - जयंत मंग्लिक, प्रमुख, रिटेल व्यहार, रेलिगेअर सेक्युरिटीज