आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दणदणीत आपटी , सेन्सेक्स ५३८ ने कोसळून २७ हजारांखाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नकारात्मक घडामोडींचा मोठा फटका बसून बुधवारी बाजारातील तेजी आटली. भांडवलाचा घटता ओघ, व्यापार तुटीतील वाढ आणि जागतिक बाजारातील नरमाई अशा वेगवेगळ्या कारणांचा बाजारावर नकारात्मक परिणाम होऊन तुफान विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स ५३८.१२ अंकांनी आपटला. एकाच दिवसात होणारी यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे. या आपटबारामुळे सेन्सेक्स २७ हजार, तर निफ्टी ८,१०० अंकांच्या खाली गेला.

जागतिक बाजारातील घसरणीमुळे चलन बाजारात रुपयाचे अवमूल्यन होऊन तो १३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी पाच वर्षांचा नीचांक गाठल्यामुळे आर्थिक वाढीबद्दल आता नव्याने चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारात विक्रीचा जोर वाढल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
चलन बाजारामध्ये मधल्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत ६४ पैशांनी घसरून ६३.५८ रुपयांच्या पातळीवर आला. हा तेरा महिन्यांचा नीचांक होता. त्याचप्रमाणे २००९ पासून पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमती घसरून जवळपास प्रति बॅरल ५६ डॉलरवर आल्या आहेत. देशाच्या व्यापार तुटीमध्येदेखील वाढ होऊन ती नोव्हेंबरमध्ये १६.८६ अब्ज डॉलर अशा दीड वर्षाच्या उच्चांकी पातळीवर गेली. या सगळ्या गोष्टी बाजारासाठी मारक ठरल्या.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५३८.१२ अंकांनी घसरून २६,७८१.४४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. ३ सप्टेंबर २०१३ नंतरची (६५१ अंक) ही सर्वात मोठी घट आहे. निफ्टीदेखील ८,१०० अंकांच्या खालच्या पातळीवर जाऊन दिवसअखेर १५२ अंकांनी घसरून ८०६७.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

घसरणीचा दिवस तेल गळती सुरूच
कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी पिंपामागे १०७ डॉलर अशा किमतीत असलेले कच्चे तेल मंगळवारी पिंपामागे ५६ डॉलरपर्यंत खाली घसरले. रशियाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पेट्रोलियम पदार्थांवर अवलंबून आहे. त्यामुळे रशियाच्या केंद्रीय बँकेने व्याजदरात वाढ केली.

रुपयाची त्रेसष्टी
कच्च्या तेलाच्या मोठ्या घसरणीने रुपयाला फटका बसला. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ५९ पैशांनी घसरून ६३.५३ पर्यंत खाली आला. हा रुपयाचा १३ महिन्यांचा नीचांक आहे.
आयातदारांकडून डॉलरला मागणी आल्यानेही रुपयाचे अवमूल्यन झाले.

सोने -चांदी घसरले
जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक कल आणि देशातून घटलेली मागणी याचा फटका मंगळवारी मौल्यवान धातूंच्या किमतीला बसला. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे १८० रुपयांनी घटून २७,२०० झाले. चांदी किलोमागे ११५० रुपयांनी घसरून ३७,०५० झाली. अमेरिका फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याच्या शक्यतेने सोन्यावरचा दबाव आणखी वाढला.

एकत्रित परिणाम
आशियाच्या प्रमुख बाजारांतील घसरण, आर्थिक पातळीवरची डबघाई, फेडरल रिझर्व्हचे धोरण, रशियाच्या केंद्रीय बँकेची व्याजदर वाढ व देशातील आर्थिक घटकांची निराशाजनक कामगिरी या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम बाजारावर दिसून आला. राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पोर्टफोलिओ