आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Fall Down 526 Number And Reach Under 19 Thousand

सेन्सेक्स 526 अंकांनी आपटून 19 हजारांखाली, रुपया गडगडला, सोने स्वस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दलाल स्ट्रीटवर बाजारातील घसरणीचे आकडे या गुंतवणूकदारांने डोक्याला हात लावले. - Divya Marathi
दलाल स्ट्रीटवर बाजारातील घसरणीचे आकडे या गुंतवणूकदारांने डोक्याला हात लावले.

मुंबई - उत्तराखंडमधील ढगफुटीनंतर आलेल्या महाप्रलयाने ओढवलेला दुर्दैवी प्रसंग ताजा असतानाच भांडवल बाजारावरदेखील फेडरल रिझर्व्हचा कोप झाला. अमेरिकेच्या मध्यवर्ती बॅँकेने अर्थात फेडरल रिझर्व्हने तेथील अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी सुरू केलेला 85 अब्ज डॉलरच्या रोखे खरेदीचा कार्यक्रम आटोपता घेण्याचे संकेत दिले. फेडरलचा हा निर्णय आणि त्यातच रुपयाचे विक्रमी अवमूल्यन गुंतवणूकदारांसाठी ढगफुटीच ठरली. बाजारात आलेल्या विक्रीच्या महाप्रलयात गुंतवणूकदारांची 1.57 लाख कोटी रुपयांची श्रीमंती पार वाहून गेली.


काहीतरी विपरीत असल्याचे सांगत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष बेन बर्नान्के यांनी मध्यवर्ती बॅँक आपला रोखे खरेदी कार्यक्रम या वर्षाच्या अखेरपर्यंत हळूहळू आवरता घेत तो पुढच्या वर्षात बंद करण्याचे संकेत दिले. बर्नान्केच्या या विधानाची वीज अगोदरच जगभरातील शेअर बाजारांवर पडली होती. त्यामुळे मुंबई आणि राष्‍ट्रीय शेअर बाजारातही काहीतरी विपरीत घडणार याची जाणीव गुंतवणूकदारांना सकाळीच झाली होती. झालेही तसेच. सेन्सेक्स घसरत्या पातळीवर उघडला. डॉलरच्या समोर हतबल होत रुपयाने विक्रमी 59.93 नीचांकी पातळी गाठली आणि भांडवल बाजारातील वातावरण बिघडले. बाजारात आलेल्या विक्रीच्या प्रलयाने अखेर धोक्याची पातळी ओलांडली आणि दिवसअखेर सेन्सेक्स 526.41 अंकांनी गडगडत 18,719.29 अंकावर येत दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर थांबला. सप्टेंबर 2011 मध्ये आलेल्या महाप्रलयात सेन्सेक्सची 704 अंकांनी धुलाई झाली होती. त्या तुलनेत हा प्रलय फार मोठा नसला तरी तो अचानक आल्यामुळे बाजाराला मोठा धक्का बसला. विक्रीचा हा प्रलय थांबवणे कोणाच्याच हाती नव्हते. त्यामुळे राष्‍ट्रीय शेअर बाजार आणि एमसीएक्सदेखील यातून सुटू शकला नाही. निफ्टीला 166.35 अंकांनी साफ करत 5655.90 अंकांच्या पातळीवर, तर एमसीएक्स शेअर बाजार 308.22 अंकांनी धुतला गेला.


विक्रीच्या मा-याचे तांडव इतके जबरदस्त होते की, सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 28 समभाग तग धरू शकले नाहीत. भांडवल बाजारातून सातत्याने बाहेर जात असलेला निधी, युरोप शेअर बाजारातील नरमाई, चीनची खराब औद्योगिक कामगिरी या काळ्या ढगांच्या छायेत गुंतवणूकदारांना आपली श्रीमंती अजिबात वाचवता येऊ शकली नाही. परिणामी सर्व 13 क्षेत्रीय निर्देशांकदेखील या विक्रीच्या पुरात वाहून गेले.


कोटक सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख दिपेन शहा म्हणाले की, विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बाजारातून काढता पाय घेण्यास केलेली सुरुवात, रुपयाची लोळण, चालू खात्यातील तूट या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम बाजारावर झाला. मोतीलाल ओस्वाल सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक म्हणाले की, बाजाराला विक्रीच्या पुराने गाठल्यामुळे निफ्टीला फटका बसला. अल्प मुदतीत नकारात्मक कल दिसून येईल.


समभागांना किनारा मिळेना
रुपयाच्या सध्या सुरू असलेल्या दररोजच्या गटांगळ्यांमुळे जुलै महिन्यातही रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची अपेक्षा करता येणार नाही याची भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे स्थावर मालमत्ता, बँका आणि अन्य व्याजदर संवेदनशील समभागांनादेखील या विक्रीच्या आपत्तीमध्ये खरेदीचा किनारा सापडू शकला नाही.


घसरलेले समभाग
जिंदाल स्टील, टाटा स्टील, हिंदाल्को, भेल, स्टर्लाइट इंड, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एनटीपीसी, एचडीएफसी, इन्फोसिस, ओएनजीसी, स्टेट बँक, आयटीसी.