आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देशांकांचे पुन्हा नवे उच्चांक, सेन्सेक्स १२३ अंकांनी उसळला, निफ्टी ३९ अंकांनी वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिना अखेरच्या वायदापूर्ती व्यवहारात निवडक ब्ल्यू चिप कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने गुरुवारी शेअर बाजारात तेजी आली. सलग ८ सत्रांतील तेजीनंतर बुधवारी सेन्सेक्सच्या तेजीला ब्रेक लागला होता. गुरुवारी झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्सने १२२.५९ अंकांच्या उसळीसह २९,६८१.७७ ही पातळी गाठली. तिकडे राष्ट्रीय शेअर बाजारातही निफ्टीने ३८.०५ अंकांच्या कमाईसह ८,९५२.३५ पर्यंत मजल मारली. दोन्ही निर्देशांकांचे हे नवे उच्चांक आहेत.

ब्ल्यू चिप समभागातील खरेदीबरोबरच विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळेही तेजीला चांगले बळ मिळाले. रिअॅल्टी, रिफायनरी, हेल्थकेअर आणि एफएमसीजी कंपन्यांचे समभाग तेजीने वधारले. कोल इंडियातील निर्गुंतवणुकीचा कार्यक्रम सरकारने जाहीर केल्याने कोल इंडियाच्या समभागात दोन टक्क्यांहून जास्त घसरण झाली. सरकार या कंपनीतील १० टक्के हिस्सा विकणार आहे. आशियातील बहुतेक बाजारात घसरण दिसून आली. चीन, तैवान, हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारात ०.५४ टक्के ते १.३१ टक्क्यांपर्यंत घट दिसून आली.
तेजीचे मानकरी : डॉ. रेड्डीज लॅब, एचडीएफसी बँक, भेल,

एफआयआयची खरेदी
विदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) शेअर बाजारातून खरेदीचा सपाटा सुरूच ठेवला आहे. एफआयआयनी बुधवारी बाजारातून १७२३.१७ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली.

अमेरिका फेडरल रिझर्व्हने यंदा व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. फेडरल रिझर्व्हच्या या आश्चर्यकारक संकेतामुळे आशिया आणि युरोपातील शेअर बाजारात घसरण दिसून आली.

क्षेत्रीय निर्देशांक वधारले
शेअर बाजारातील रिअॅल्टी (३.१४ टक्के वाढ), रिफायनरी (१.५५ टक्के), हेल्थकेअर (१.०८ टक्के), एफएमसीजी (१.०७ टक्के), भांडवली वस्तू (०.८२ टक्के) आणि टिकाऊ वस्तू (०.६४ टक्के वाढ) या क्षेत्रीय निर्देशांकांत वाढ दिसून आली.